ठाणे महापालिकेत शिक्षक आणि वरिष्ठ लिपिकांना पदोन्नती
ठाणे महानगरपालिकेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या पदोन्नती प्रक्रियेस अखेर मूर्तरूप मिळाले असून, बुधवारी 38 उपशिक्षक आणि 53 वरिष्ठ लिपिकांना पदोन्नती देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने ही पदोन्नती प्रक्रिया पार पडली. उपशिक्षकांना मुख्याध्यापक, तर वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधिक्षक या पदावर बढती मिळाल्याने शिक्षण क्षेत्रासह महापालिकेच्या प्रशासनातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पदोन्नतीच्या या आदेशाची अधिकृत घोषणा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी केली. याआधी मंगळवारी ४६ वरिष्ठ लिपिक, १९ अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) आणि २ सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी अशा एकूण ६७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यामुळे मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत एकूण १५८ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
मयूरी हगवणेच्या ‘या’ प्रकरणामुळे पोलिसांच्या अडचणी वाढणार? महिला आयोगाचे थेट CM फडणवीसांना पत्र
गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे महापालिकेतील विविध पदे रिक्त होती. त्यामुळे कार्यक्षमतेत अडथळे येत होते. ही परिस्थिती लक्षात घेता, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनास पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आस्थापना विभागास तातडीने कृती करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होणार असून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक प्रभावी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची लवकरच नवीन पदांवर पदस्थापना करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पदोन्नतीमुळे महापालिकेतील शिक्षक, लिपिक व इतर कर्मचारी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त सौरभ राव यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शनामुळे आणि प्रशासनाच्या तातडीच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. यामुळे महापालिकेच्या कामकाजात नवे उत्साह निर्माण झाला असून, याचा सकारात्मक परिणाम सेवाभाव आणि कार्यक्षमतेवर होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.