फटाक्यांमुळे आगीच्या घटना होत असल्यामुळे पुणे अग्निशमन दलाकडून सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Diwali 2025: पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या सामानांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीमध्ये फटाका वाजवण्याचे प्रमाण देखील मोठे असते. घरोघरी आतिषबाजी केली जाते. मात्र यामुळे अनेकदा आगीच्या घटना देखील होत असतात. याच पार्श्वभूमीवर पुणे अग्निशमन दलाने तयारी सुरु केली आहे. दिवाळीमध्ये कोणतेही विघ्न न येता सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी सुबद्ध नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांसाठी काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
सुरक्षित आणि आनंदी दिवाळीसाठी पुणे अग्निशमन दलाचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यंदा विशेष “फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु केली आहे. मुख्य अग्रिशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवली जात असून नागरिकांमध्ये सुरक्षितते बाबत जागरूकता निर्माण करणे आणि आग अपघातांना आळा घालणे हे उद्दिष्ट आहे. शहरातील सर्व २३ अग्निशमन केंद्रांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. फटाक्यांच्या स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत आहेत व मेगा फोनद्वारे जन जागृती संदेश दिले जात आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, “आमचा उद्देश दिवाळीचा आनंद टिकवून सुरक्षितता अबाधित ठेवण्याचा आहे. निष्काळजीपणा टाळला तर प्रत्येक घरात प्रकाश आणि आनंद राहील. आम्ही ही दिवाळी सुरक्षित दिवाळी’ म्हणून साजरी व्हावी, अशी अपेक्षा ठेवतो.” असे अग्निशमन अधिकारी म्हणाले आहेत.
अग्निशमन विभागाचे नागरिकांना आवाहन :
१) फटाके नेहमी मोकळ्या जागेतच फोडावेत. गर्दीच्या भागात, इमारती जवळ किंवा वाहनां जवळ फटाके फोडू नयेत.
२) लहान मुलांना एकटे फटाके फोडू देऊ नयेत. त्यांच्या जवळ मोठ्यांचा देखरेख आवश्यक आहे.
३) फटाके हातात धरून पेटवू नयेत. अर्धवट फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
४) नायलॉन वाले कपडे वापरू नयेत; सूती कपडे वापरावेत.
५) पेटते दिवे, मेणबत्त्या आणि अगरबत्त्या फटाक्यांच्या जवळ ठेवू नयेत.
६) फटाके फोडताना किमान पाच मीटर अंतरा वर उभे राहावे.
७) ज्वलनशील द्रव्ये, गॅस सिलिंडर, वाहनं वा विजेच्या तारा यांच्या जवळ फटाके फोडू नयेत.
८) फटाक्यांचा साठा घरात, वाहनात किंवा तळमजल्यात ठेवू नये. विक्रेत्यांनी साठा ठेवताना अग्निशमन परवानगी घेणे आवश्यक आहे.
९) फटाके विक्री केंद्रात अग्निशामक यंत्र (fire extinguisher) ठेवणे बंधनकारक आहे.
१०) प्रदूषण टाळण्यासाठी शक्यतो ‘ग्रीन फटाके वापरावेत.
११) फटाके संपल्यावर परिसरस्वच्छ ठेवावा.
१२) आग लागल्यास तत्काळ पाण्याने किंवा वाळू ने आग विझवावी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मागील चार वर्षातील दिवाळी सणामध्ये लागलेल्या आगींची माहिती
वर्षे | दिवाळीतील आगीच्या घटना |
---|---|
2021 | 21 |
2022 | 19 |
2023 | 35 |
2024 | 60 |