पुण्यातील शाळेने पटकावले सर्वोत्तम 10 शाळांमध्ये स्थान (फोटो- ओमकुमार वाघमोडे)
पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने ‘टी फोर एजुकेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज’ स्पर्धेत जागतिक स्तरावरील सर्वोत्तम १० शाळांमध्ये स्थान पटकावले आहे. ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या विभागात भारतातून निवडली गेलेली ही एकमेव शाळा असून, ऐतिहासिक कामगिरी राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरूजी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाली आहे.
कधी केवळ मोजक्या विद्यार्थ्यांसह बंद होण्याच्या वाटेवर असलेली ही शाळा, आज जागतिक शैक्षणिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. वाबळेवाडी येथून बदली होऊन आलेले वारे गुरूजी यांनी शाळेच्या पुनर्बांधणीची जबाबदारी घेतल्यानंतर काही महिन्यांतच या शाळेचा चेहरामोहराच बदलला.
मोडकळीस आलेल्या या शाळेच्या खोल्यांमधून सुरू झालेल्या या शाळेत आज फ्रेंच, जर्मनसारख्या परकीय भाषा शिकवल्या जातात, विद्यार्थ्यांना उपग्रह निर्मितीचे धडे दिले जाते आणि इस्रो सोबत शैक्षणिक करार देखील केला आहे.शाळेमध्ये ७ वी पर्यंतचे वर्ग असुन १२० विद्यार्थी पटसंख्या आहे. शाळेत दोनच शिक्षक कार्यरत आहेत तर अजून दोन शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. शाळेला नंबर एक बनण्याचे शाळेचे ध्येय असल्याचे वारे गुरुजींनी सांगितले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या जगभरातील लाखो शाळांमधून विविध टप्प्यांवर जालिंदरनगर शाळेने यश मिळवत ‘जागतिक स्तरावरील सर्वोत्तम १०’ शाळेंच्या यादीत स्थान मिळवले आहे. स्पर्धेचा उद्देश बक्षीस नसून, सरकारी शाळांमध्येही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवून देण्याची चळवळ आहे, असेही यांनी स्पष्ट केले.
“लोकसहभागातुन शाळेचे नंदनवन झाले आहे. ‘जागतिक स्तरावरील सर्वोत्तम १०’ शाळांमध्ये आपले स्थान निर्माण करते, त्यातल्या त्यात सरकारी शाळा हे यश सुखावणारे आहे. आपल्या मातीत चांगलं काही घडलं नाही तर, आपण पुढे जाऊ शकत नाही. सरकारी शाळा टिकवायच्या असतील तर लोकसहभाग गरजेचा आहे. समाजाचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या निमित्ताने नक्कीच बदलेल व सकारात्मकता निर्माण होईल अशी खात्री वाटते. सरकारी शाळांमधील शिक्षकांचा आत्मविश्वासही वाढीस लागेल व आपल्या सरकारी शाळा जागतिक दर्जाच्या होण्याच्या प्रक्रियेस अधिक गती मिळेल.
– दत्तात्रय वारे गुरुजी.
शाळेसाठी जमीन दान केली. तिथे सरकारनी शाळा बांधली,
“मंदीर बांधले परंतु, मंदिरात देव नव्हता पण, तो वारे गुरुजींच्या माध्यमातून शाळेला लाभला हे सिद्ध झाले. माळरानाचे रूपांतर नंदनवनात झाले.
चांगदेव जोडगे, ग्रामस्थ जालिंदरनगर