महापालिकेच्या मतदारयादीत पळवापळवी; तीन लाख मतदारांवर प्रश्नचिन्ह
आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुकांनी निवडणूक शाखेकडे शुल्क भरून याद्यांची तपासणी सुरू केली आहे. मतदारांची नावे आणि पत्ते तपासताना यात मोठ्या चुका आढळल्या आहेत. यापूर्वीही पुणे शहरातील माणिकबाग, वारजे, कर्वेनगर, मध्यवर्ती पेठांमधील प्रभाग आणि हडपसर येथे मतदार याद्यांमध्ये मोठ्या गडबडी झाल्याच्या तक्रारी होत्या.
महापालिका तंत्रज्ञानाचा वापर करून याद्या तयार करत असल्याचा दावा करत असली, तरी प्रारूप मतदारयाद्या तयार करताना आरोग्य निरीक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांवर राजकीय प्रभाव टाकून मतदारांची पळवापळवी होत असल्याचा आरोप अनेकदा झाला होता. तक्रारी दाखल होऊनही पुन्हा असे प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांत क्षेत्रीय कार्यालयांकडे एकुण ४९ तर मुख्य निवडणुक कार्यालयाकडे तीन हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. याद्या प्राप्त झाल्यानंतर या हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ज्या अधिकाऱ्यांना पुण्याची माहिती नाही त्यांची सहाय्यक आयुक्त पुणे मनपा या पदी नेमणूक झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रभागात प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे असा आरोप आपले पुणे, आपला परीसर या संस्थेने केला आहे. जे मतदार या भागामध्ये नाहीत त्यांची नोंद ही त्या प्रभागांमध्ये केली आहे हे मोठे षडयंत्र आहे त्याविरुद्ध आम्ही लढणार आहोत, असे संस्थेचे उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी नमूद केले आहे.
मतदार यादी नेण्यास इच्छुक उमेदवारांकडून सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रभाग निहाय यादीची विक्री केली जात आहे, प्रति पान, बाईंडींग, जीएसटीसह या मतदार याद्यांची किंमत वेगवेगळी आहे, यादी विक्रीतून गेल्या दोन दिवसांत सुमारे सहा लाख रुपये जमा झाले आहेत. सर्वांत जास्त किमत ही प्रभाग क्रमांक ३८ च्या मतदार यादीची आहे, या यादीसाठी सुमारे ४० हजार २६६ रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे. त्याखालोखाल (प्रभाग क्रमांक ४१ ३४ हजार ९९ रुपये), प्रभाग क्रमांक ९ ३२ हजार २८५ रुपये इतकी आहे, तर सर्वांत स्वस्त यादी ही प्रभाग क्रमांक २६ची असुन, त्यासाठी ११ हजार ११८ रुपये मोजावे लागत आहे.
– प्रभाग क्र. १ (कळस धानोरी लोहगाव उर्वरित) आणि प्रभाग क्र.३ (विमाननगर लोहगाव) या दोन्ही प्रभागांतील मतदार परस्पर एकमेकांच्या यादीत टाकण्यात आले आहेत.
– प्रभाग क्र. ७ (गोखलेनगर-वाडकेवाडी) मधील अनेक याद्या थेट प्रभाग क्र. १२ (शिवाजीनगर मॉडेल
कॉलनी) मध्ये गेल्या आहेत.
यादी क्रमांकांमध्ये गडबडः
– यादी क्रमांक १३५ आणि १५३ मधील जवाहरनगर, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सिंचननगर, सावली सोसायटी येथील मतदारांचीही पळवापळवी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
– प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह
‘प्रारूप यादीत झालेल्या त्रुटी दूर मागविण्यात आल्या आहेत. हरकती आल्यानंतर त्यावर सुनावनी घेतली जाईल आणि मतदारांच्या शंकांचे निराकरण केले जाईल.’
प्रसाद काटकर,
उपायुक्त, निवडणूक विभाग,
प्रभाग क्र. २० (शंकर महाराज मठ-बिबवेवाडी) या प्रभागातील डायस प्लॉट, सेना दत्त पेठ, पानमळा, चैत्रबन सोसायटी येथील शेकडो मतदारांना अन्य प्रभागात टाकण्यात आले आहे. याउलट, वाच प्रभागातील रम्य नगरी, प्रेम नगर सोसायटी, गुरुराज सोसायटीचा काही भाग आणि सातारा रस्त्यावरील काही सोसायटधांचा मोठा भाग दुसऱ्या प्रभागांना जोडण्यात आला आहे.
प्रभाग क्र. ६ आणि २८ मधील अदलाबदल: प्रभाग क्रमांक ६ (सहकारनगर पद्मावती) येथील शाहू कॉलेज, पर्वती पोलिस ठाणे, पंचमी हॉटेल या भागातील मतदार थेट प्रभाग क्रमांक २८ (नवी पेठ-पर्वती) मध्ये गेले आहेत. हक्काचा मतदार दुसऱ्या प्रभागात गेल्याने इच्छुकांच्या रणनीतीवर परिणाम होणार आहे.






