Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
अशातच महाविकास आघाडीच्या वर्तुळात एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई काँग्रेसचे एक शिष्टमंडळ बीएमसी निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी, सिल्व्हर ओक येथे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या काँग्रेस शिष्टमंडळात अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांचा समावेश होता. ही बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी युतीच्या रणनीतींवर चर्चा करण्यासाठी झाल्याचे मानले जाते.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक शक्यतांना उधाण आले आहे. या भेटीमागे काही महत्त्वाचे राजकीय संकेत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काँग्रेस काही महत्त्वाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबत युती कायम ठेवू इच्छित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे.
काँग्रेसला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची स्वतंत्र युती आपल्या सहभागाशिवाय तयार होऊ नये, अशी भूमिका असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेस शरद पवारांवरही ठाकरे गटापासून अंतर ठेवण्याचा दबाव आणतील, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
महापालिका निवडणुकीत सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा काँग्रेसने वारंवार केली आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो. अशा स्पष्ट भूमिकेनंतर काँग्रेस शरद पवारांसोबत युती करण्याचा विचार का करते?
काँग्रेस आपला स्वतंत्र लढतीचा निर्णय मागे घेण्यास तयार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्ष महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती करून लढतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीपासून दूर जातील का, असा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जात आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेसचे कोणतेही वरिष्ठ नेते आजवर महाविकास आघाडीच्या भविष्यासंदर्भात अधिकृत भूमिका मांडलेली नाही. परिणामी, विरोधी आघाडीतील अस्पष्टता आणि गोंधळ अधिकच वाढला आहे.






