बिहारमध्ये पुन्हा एकदा 'नितीश नीती' यशस्वी (फोटो- एआय जेमिनी)
गेल्या 20 वर्षांपासून बिहारवर नितीश कुमारांची पकड
नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत
तेजस भागवत/पुणे: बिहारमध्ये एनडीएने पुन्हा एकदा प्रचंड बहुमत प्राप्त करून सरकार स्थापन केले आहे. नितीश कुमार यांनी 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पूर्वीच्या काळी लालू प्रसाद यादव यांच्या भोवती फिरणारे बिहारचे राजकारण आता नितीश कुमार यांच्याबाजूने फिरताना दिसत आहे. निवडणुकीत भाजप, नितीश कुमार व एनडीएमधील सहयोगी पक्षांनी जोरदार कामगिरी केली. एनडीएने 202 जागा मिळवून पुन्हा सरकार स्थापन केले आहे. हा विजय एकतर्फी दिसत असला तरी सोपा नक्कीच नव्हता.
जयप्रकाश नारायण आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या तालमीत तयार झालेले नितीश कुमार हे 20 वर्षांपासून बिहारमध्ये आपली पकड ठेवून आहेत. विरोधकांना नितीश कुमारांची ही पकड सोडवता आलेली नाही. एकेकाळी लालू प्रसाद यादव यांच्या भोवती असलेले बिहारचे राजकारण गेल्या 20 वर्षांत संपुष्टात आले आहे. निवडणुकीत एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी लढत झाली. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी प्रचंड मेहनत करत ही निवडणूक रंगतदार आणि प्रतिष्ठेची केली. मात्र सहयोगी पक्षांची साथ न लाभल्याने तेजस्वी यादवांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. एनडीएच्या विजयाला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या.
Bihar Election Result 2025 Live: बिहारमध्ये महागठबंधनचा ‘या’ कारणांमुळे सुपडासाफ; केवळ 28…
बिहारच्या निवडणुकीत एनडीएच्या विजयात विरोधकांचा वाटा देखील तितकाच दिसून येतो. शेवटपर्यंत सुरू असलेले जागावाटप, अंतर्गत वाद, एकमेकांच्याविरुद्ध उमेदवार उभे करणे अशी अनेक कारणे महागठबंधनच्या पराभवाला कारणीभूत ठरली. ग्राऊंड लेव्हला जाऊन काम करणारे कार्यकर्ते आणि जिंकण्याची प्रबळ इच्छा हे भाजपच्या विजयाचे सूत्र म्हणावे लागेल.
एनडीएच्या विजयामध्ये बिहारच्या महिला मतदारांचा मोठा भाग असल्याचे दिसून आले. बिहारमध्ये यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. याचा फायदा एनडीएला झाला. तेजस्वी यादव यांनी बिहार जिंकण्यासाठी मुस्लिम-यादव हा फॉर्म्युला वापरण्यावर जोर दिला. तर एनडीएने एम म्हणजेच महिला आणि वाय म्हणजेच युवा असा प्रचार केला.
नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आश्वासक चेहरा हा एनडीएच्या विजयासाठी फायदेशीर ठरला. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर विकास करणे सुलभ होते या प्रकारचा करण्यात आलेला प्रचार, महिला रोजगार योजना, सामान्य कुटुंबांना 125 युनिट पर्यंत मोफत वीज आणि स्थानिक पातळीवर अत्यंत सूक्ष्म नियोजन, वेळेत केलेले जागावाटप या सर्व गोष्टी बिहरमध्ये एनडीएच्या विजयासाठी फायदेशीर ठरल्या. विरोधकांनी एसआयआर आणि मतचोरी आणि अन्य मुद्दे धरून एनडीएला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मत चोरीच्या आरोपामुळे एनडीएला फटका बसणार असे वाटत होते. मात्र जनतेने नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास ठेवल्याचे दिसून आले.
Bihar Election मध्ये देवेंद्र फडणवीसांचा जलवा! ‘या’ मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांची आघाडी
महागठबंधनला यंदाच्या निवडणुकीत केवळ 35 जागा जिंकता आल्या. तेजस्वी यादव, राहुल गांधी यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. मात्र महागठबंधनच्या नेत्यांना गर्दीचे रूपांतर मतदानात करता आले नाही. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांना निवडणुकीच्या आधी घोषित केले, तर त्याचा फायदा उठवता आला नाही. राहुल गांधी यांनी मत चोरी, एसआयआरचा मुद्दा उचलून धरला. मात्र बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर विश्वास दाखवल्याचे दिसून येत आहे भाजपवर देखील सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला गेला. मात्र जनतेचा निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळे विरोधकांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे एवढे मात्र नक्की.






