Indrayani River Flood: इंद्रायणीचे पाणी ओसरले, पण जखमा कायम! देहू आणि आळंदीत संसाराचा कोळसा
Alandi News: रौद्ररूप धारण केलेल्या इंद्रायणी नदीचे पाणी अखेर ओसरले असून देहूगाव परिसरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, पुराचे पाणी ओसरले असले तरी महापुराने दिलेल्या जखमा कायम आहेत. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लहान व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. Pune Rain
इंद्रायणी नदीकाठावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने माल खराब झाला आहे. काही व्यावसायिकांची दुकाने आणि साहित्य पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात आले. मंडप व्यावसायिकांनी उभारलेल्या चेंजिंग रूम तसेच मोबाईल टॉयलेटही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
इंद्रायणी नदीघाटालगतच्या येलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धर्मशाळा, घरे आणि दुकानांमध्येही पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला असून, पूर ओसरल्यानंतर नागरिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.मात्र, अद्याप अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याची भावना नागरिक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. शासनाकडून वेळेत आर्थिक मदत मिळणार का, असा प्रश्न पूरग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे.पूरग्रस्त नागरिकांनी शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि पात्र लाभार्थ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, देहू शहरातील अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दि. १० रोजी देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, देहू शहरात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे, नाले तसेच इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढून अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरे, दुकाने, जीवनावश्यक वस्तू, व्यावसायिक साहित्य तसेच इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावेत. तसेच शासनाच्या प्रचलित नियमांनुसार पात्र नागरिकांची यादी तयार करून ती महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे त्वरित सादर करण्यात यावी, जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई मिळू शकेल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“इंद्रायणी नदीला लागून असलेल्या खेड तालुक्यातील येलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त सर्व घरे, दुकाने तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
— गणेश कांताराम बोत्रे (पुणे जिल्हा परिषद सदस्य)






