Ambegaon Landslide: आंबेगावातील दरडग्रस्त ५ गावांचे पुनर्वसन करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी ग्वाही
Pune Rain Updates : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी डोंगरकडे कोसळून दरडी पडल्याने प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले असून, काही दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. भातशेतीचेही मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला.
वळसे पाटील यांनी उगलेवाडी, गोहे बुद्रुक, गोहे खुर्द, माळीण, पसारवाडी, आंबडे, पोखरी येथील बेंढारवाडी, जांभोरी तसेच काळवाडी क्रमांक १ व २ या दरडप्रवण भागांना भेट देत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी भूस्खलनग्रस्त ठिकाणे, कोसळलेल्या दरडी, तुटलेले रस्ते तसेच पाण्याखाली गेलेल्या भातशेतीची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिला लोहकरे, ज्येष्ठ सदस्य संजय गवारी, उपसभापती ज्योती पारधी, माजी सभापती प्रकाश घोलप, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, सुभाष तळपे, तहसीलदार राहुल सारंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सूर्यकांत कुंभार, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरडीमुळे बंद झालेले रस्ते तातडीने वाहतुकीसाठी खुले करावेत तसेच भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी, अशा सूचना वळसे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना दिलीपराव वळसे पाटील म्हणाले, “आंबेगाव तालुक्यात माळीणप्रमाणे अतिधोकादायक स्थितीत असलेली पाच गावे आहेत. या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला शासन सर्वोच्च प्राधान्य देईल. नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत तातडीने मिळावी, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्कात राहावे.”
अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगताना आदिवासी शेतकरी भागु धोंडु भोकटे म्हणाले, “यंदाच्या मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी बांध फुटून भाताची रोपे वाहून गेली असून रस्तेही बंद झाले आहेत. शासनाने नुकसानभरपाई देऊन रस्ते तातडीने सुरू करावेत. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल.”अतिवृष्टीमुळे पश्चिम आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. दरडग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह शेतीच्या नुकसानीची भरपाई आणि रस्ते पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.






