पुणे रेल्वेकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठी कारवाई; दंडही केला वसूल
पुणे : पुणे रेल्वे विभाग आणि वाणिज्य विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे परिसरात अन्न आणि वस्तूंची अनधिकृत विक्री करण्यास मनाई असताना देखील हे लोक विक्री करत होते. त्यामुळे रेल्वे विभागाकडून मे २०२५ ते १० जून २०२५ पर्यंत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत सततच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून या अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
आयुक्त प्रियांका शर्मा, व्यावसायिक व्यवस्थापक अनिल फेरीवाल्या कुमार पाठक यांच्या नेतृत्वाखाली, पुणे विभागात अनधिकृत फेरीवाले आणि विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि वाणिज्य विभागाने संयुक्त मोहीम राबवण्यात आली होती. मे २०२५ मध्ये, आरपीएफने एकूण ७०६ प्रकरणे नोंदवली आणि २,८८,६७० रुपयांचा दंड वसूल केला, तर जून महिन्यात १० जून २०२५ पर्यंत २८२ प्रकरणे नोंदवली गेली आणि ९६,०२० रुपयांचा दंड वसूल केला गेला. त्याचप्रमाणे, वाणिज्य विभागाने मे २०२५ मध्ये १९५ प्रकरणे नोंदवली गेली आणि ३९,२५० रुपयांचा दंड वसूल केला गेला आणि जून महिन्यात १० जून २०२५ पर्यंत १३१ प्रकरणे नोंदवली गेली आणि ३८,६०० रुपयांचा दंड वसूल केला गेला.
पुणे विभागाकडून जाहीर करण्यात आले की, रेल्वे परिसरात सुरक्षितता आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी भविष्यातही अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवली जाईल. प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून कोणत्याही वस्तू खरेदी करू नयेत, कारण रेल्वे परिसरात अनधिकृत विक्री करणे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे.