मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या भारतीय जनता किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज (भाऊ) ढोरे व उद्योजक सचिन (बाळा) ढोरे यांच्या मातोश्री होत. मावळ पंचायत समितीचे दिवंगत माजी सभापती दादासाहेब ढोरे यांच्या त्या पत्नी, तर पुणे शहराचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांच्या त्या कन्या होत्या.
पहिल्या महिला आमदार होण्याचा मान
मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या प्रथम महिला उमेदवार म्हणून त्यांनी सन १९९५ ची विधानसभा निवडणूक लढवली. तत्कालीन राज्यमंत्री मदन बाफना यांचा पराभव करत त्या मावळच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी राज्यात भाजप–शिवसेना युतीचे सरकार असून मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
हे देखील वाचा : अजित पवारांना अखेरचा निरोप! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल
आमदार रुपलेखा ढोरे यांचा राजकीय प्रवास
रुपलेखा ढोरे यांनी १९९२ साली तत्कालीन वडगाव–इंदोरी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्याच काळात पंचायत समितीमध्ये काँग्रेस व भाजपचे समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठ्या टाकून उपसभापतिपदाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत त्या विजयी ठरल्या आणि तीन वर्षे उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळला. तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या स्कूल कमिटीच्या चेअरमन म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. नंतर त्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या सल्लागार मंडळावर कार्यरत होत्या.
हे देखील वाचा : कोकणच्या मदतीला धावणारे कार्यक्षम नेतृत्व हरपले; अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
विकासकामांचा ठसा
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्या आमदार झाल्या. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तालुक्यात ५५ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. मावळ तालुका टँकरमुक्त करण्यात आला. तसेच मंगरूळ येथील आंद्रा धरणाच्या कामालाही त्यांच्या कार्यकाळात सुरुवात झाली. मावळच्या विकासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.






