पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू (Photo Credit - X)
Pune Accident: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ बुधवारी एक हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना घडली. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड कंटेनरचे नवले ब्रिजवर अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे सहा ते सात गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आणि त्यापैकी दोन वाहनांना भीषण आग लागली.
जखमी आणि मृतकांची संख्या
या अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुणे शहर पोलिसांनी हा आकडा ६ असल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेत सुमारे २० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. अपघातानंतर नवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे.
मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणतात, “पुणे-बेंगळुरू महामार्गावर आज नवले पुलाजवळ एका जड वाहनाने नियंत्रण गमावले आणि अनेक वाहनांना धडक दिली. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आम्ही मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.”
मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.
त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले, “पुण्यातील नवले पुलावर झालेल्या या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.”
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 13, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हळहळ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या अपघातावर दुःख व्यक्त केले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “पुण्याच्या नवले पुलाजवळ झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात एका महिलेच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”
पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती… — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 13, 2025
अपघातांचे केंद्र नवले पूल
पुण्यातील नवले पूल हा सातत्याने अपघातांचे केंद्र ठरत आला आहे. या अपघातांच्या मालिकेतील १३ नोव्हेंबरची ही घटना अत्यंत भयानक होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अनियंत्रित ट्रकने सुरुवातीला ३ ते ४ कारला धडक दिली. या धडकेनंतर दोन कंटेनरच्या मध्ये एक कार पूर्णपणे जळताना दिसली. या कारला लागलेली आग वाढत जाऊन एका ट्रकलाही पसरली. पोलिसांनी सांगितले की, अडकलेल्या लोकांना आणि वाहनांना बाहेर काढणे हे आमचे पहिले आणि महत्त्वाचे काम आहे.






