सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : पाटस रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी एका ज्येष्ठ महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. रेल्वे लाईन ओलांडत असताना अचानक मालगाडी सुरू झाल्याने महिलेने क्षणाचाही विलंब न करता थेट रुळांच्या मध्यभागी झोपून स्वतःचा जीव वाचवला आहे. हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग पाहून स्थानकावरील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
शनिवारी (दि ९) सकाळी एक ज्येष्ठ महिला पाटस रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळ ओलांडत होती. त्याच दरम्यान अचानक मालगाडी सुरू झाली. मागे-पुढे जाण्यास वेळ नसल्याचे लक्षात येताच महिलेने प्रसंगावधान दाखवत रुळांच्या मधोमध आडवी झोप घेतली. मालगाडीचे सर्व डबे तिच्या अंगावरून गेले, मात्र सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. गाडी गेल्यानंतर ती सुखरूप बाहेर आली. त्यामुळे हा क्षण पाहत असलेल्या प्रवाशांनी महिला सुखरूप दिसल्याने सुटकेचा निःश्वास टाकला मात्र तो दोन मिनिटांचा प्रसंगाने त्या ठिकाणी असलेल्या प्रवाशांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर
या घटनेमुळे पाटस रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. पाटस रेल्वे स्थानकावर ओव्हर ब्रिजचे काम एका बाजूलाच पूर्ण झाले आहे. त्यामुळे कानगाव बाजुकडे पादचारी पुलाचे काम करण्याची मागणी मागील काही दिवसापूर्वी अॅड. संदीप ससाणे आणि स्थानिक नागरिकांनी पुणे आणि मुंबई रेल्वे प्रशासनाकडे केली होती. रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार, बैठका व निवेदने देऊन पाटस स्थानकावर फूट ओव्हर ब्रिज व सुरक्षित पादचारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मात्र, काम मंजूर होऊनही अपेक्षित गतीने होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
ब्रिजचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे
‘काम मंजूर होऊनही वेळेत पूर्ण होत नसेल आणि निष्काळजीपणामुळे एखाद्या प्रवाशाचा जीव गेला तर त्याचा काय उपयोग? असा संतप्त सवाल नागरिक आणि प्रवाशी विचारत आहेत. पाटस स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, स्टेशन परिसरात कायमस्वरूपी आरपीएफ जवान तैनात करावेत, प्रवाशांसाठी सुरक्षित पादचारी मार्गाची तात्काळ व्यवस्था करावी, रखडलेली इतर पायाभूत सुविधा आणि विकासकामे त्वरित मार्गी लावावीत, रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पाटस व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.






