अजित पवारांकडून हिंजवडीत विकासकामांची पाहणी (फोटो- ani)
पिंपरी: मान्सूनपूर्व पावसाने आयटी पार्क असलेल्या हिंजवडीची दाणादाण उडवली होती. तसेच अनधिकृत बांधकामामुळे हिंजवडीचा श्वास गुदमरत होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. आज भल्या पहाटेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी मेट्रोची पाहणी केली. तसेच इतर कामांचा देखील आढावा घेतला. अजित पवार हे आपल्या धडाकेबाज कार्यासाठी ओळखले जातात. हिंजवडीत सुरु असणाऱ्या विकास कामाची त्यांनी पाहणी केली अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या.
आज भल्या पहाटेच अजित पवार हिंजवडीत दाखल झाले. यावेळी त्यांनी मेट्रो कामाची देखील पाहणी केली. दरम्यान अजित पवारांनी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले. आपल्या कामाच्यामध्ये कोणी आले तर त्याच्यावर ३५३ दाखल करा. आपले असं ठरले आहे कि कोणीही मध्ये आले तरी त्याच्यावर ३५३ दाखल करायचा. अजित पवार जरी मध्ये आला तरी त्याच्यावर ३५३ दाखल करा. ३५३ लावल्याशिवाय हे होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण माझं हे करा माझं ते करा असं सुरूच राहील. आपल्याला पूर्ण काम करून टाकायचे आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचे प्रशासनाला स्पष्ट आदेश
मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी परिसरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पावसाचे मोजमाप, पाण्याचा प्रवाह, बुजवलेले ओढे आणि अनधिकृत बांधकामांबाबत सर्वेक्षण सुरू केले आहे. ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
हिंजवडीत सरासरी किती पाऊस पडतो? किती पाणी साचते आणि वाहते? कोणते ओढे बुजवले गेले आहेत? ओढ्यांवर किती आणि कोणत्या प्रकारच्या अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत? ओढ्यांवरील इमारती पाडण्याचे आदेश पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, ओढ्यांवर बांधलेल्या अनधिकृत इमारती हटवाव्यात. इमारती खूप मोठ्या असतील आणि त्यांचे स्थलांतर तातडीने शक्य नसेल, तर त्यामधून पर्यायी मार्गाने ओढ्यांना नदीपर्यंत प्रवाहित करण्याची योजना आखावी, असे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.
पवारांनी केली अधिरकुत बांधकामाची पाहणी
आज भल्या पहाटेच अजित पवार यांनी हिंजवडीतील अनधिकृत बांधकामाची पाहणी केली आहे. हिंजवडीतील अधिरकुत बांधकाम पाडण्याचे आदेश अजित पवारांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम पडल्यास वाहुतक कोंडीचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.