महिलेसोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न (फोटो- istockphoto)
पुणे: हडपसरमधील एका नामांकित बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्याशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने व्यवस्थापकास विरोध केल्याने तिची बदली करण्याची धमकी दिली. याप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. हडपसर येथील एका नामांकित बँकेत पीडित महिला कर्मचारी आहे.
महिला बँकेत जाताना व्यवस्थापकाने तिला अडवले. ‘तुमचे कपडे चांगले आहेत. बँकेत न जाता आपण हॉटेलात जाऊ,’ असे व्यवस्थापक तिला म्हणाला. महिलेने त्याला नकार दिला. तसेच, तिने त्याला बँकेत सोडण्यास सांगितले. नंतर त्याने तिला बँकेत सोडले. घटनेची कोणाला माहिती दिल्यास तुझी बदली करेल, अशी धमकी दिली. नंतर त्याने महिलेला त्रास दिला. महिलेच्या कामात चुका काढून तिला त्रास दिला. त्यानंतर महिलेची हडपसर शाखेतून वारजे, मार्केट यार्ड शाखेत बदली केली. त्यानंतर तिची डेक्कन जिमखाना भागातील विभागीय कार्यालयात बदली केली. त्याच्या त्रासामुळे घाबरलेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.
व्यावसायिकाची कार अडवून लुटण्याचा प्रयत्न
दांडेकर पुल ते पानमळापर्यंत दुचाकीवरील ६ समाज कंटकांनी एका कारमधून निघालेल्या व्यावसायीकाचा पाठलाग करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिकाने प्रकार ओळखत कार लॉक केल्यानंतर मात्र, समाजकंटकांनी शस्त्रे काढून हौदोस घालत दगडाने कारच्या काचा फोडत दहशत माजविल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात फर्निचर व्यावसायीक संतोष पुनमाराम सुथार (रा. वारजे माळवाडी) यांनी दुचाकीवर आलेल्या आठ जणांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुथार यांच्या तक्रारीनुसार नेहमीप्रमाणे तक्रारदार दुकान बंद करून त्यांच्या कारमध्ये रात्री आठच्या सुमारास निघाले होते. दांडेकर पुलावरून जात असताना तीन दुचाकीवर असलेल्या आठ जणांनी त्यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष यांनी हॉर्न वाजविल्यानंतर टोळक्याने कारचा पाठलाग केला. पानमळा येथे कार आल्यानंतर ती आडवली.
हेही वाचा:व्यावसायिकाची कार अडवून लुटण्याचा प्रयत्न; दांडेकर पुलाजवळील घटनेने खळबळ
तसेच, हुज्जत घालत पैशाची मागणी केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. काही वेगळा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच सुथार यांनी गाडी लॉक करत काच वरती केले. तेव्हा एकाने गाडीवर दगड फेकून मारला तर दोघांनी त्यांच्या कमरेला लावलेले धारदार हत्यार दाखवले. त्याचवेळी तक्रारदार फोन काढून व्हिडीओ बनवत असताना आरोपींनी समोरील काचेवर दगड फिरकावला. हा सर्व प्रकार घडताना व कारवर दगड फेकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत हॉर्न वाजविण्याच्या कारणातून झालेला हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र निष्पन्न आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.