बारामतीमध्ये काका-पुतणे लढत होणार (फोटो- टीम नवराष्ट्र)
बारामती : बारामती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याने आता बारामतीत मुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका विरुद्ध पुतण्या लढत होणार आहे. कुटुंबातील या राजकीय लढाईमुळे कोणता झेंडा घेऊ हाती?, अशी अवस्था बारामतीकरांची झाली आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बारामतीकरांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सन्मान जपला, आता विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान बारामतीकर जपणार का?, याची उत्सुकता राज्याला लागली आहे.
लोकसभा निवडणुकी वेळी बारामतीतील मतदारांनी लोकसभेला “ताई” तर विधानसभेला ” दादा” अशी भूमिका अनेक माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा सन्मान जपत बारामतीकरांनी खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून ४८ हजारांचे मताधिक्य दिले. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे बारामती विधानसभेसाठी सुरुवातीला निवडणूक न लढवण्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले होते. मात्र कार्यकर्त्यांनी पत्रांद्वारे तसेच त्यांचा ताफा अडवून विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवावी, असा आग्रह धरला. अजित पवार यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत जोरदार मोर्चे बांधणी करून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचे मोठे काम बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ सर्वाधिक महिलांना मिळण्यासाठी सुरुवातीपासूनच स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मोठे मेळावे बारामती मध्ये आयोजित करून उपमुख्यमंत्री पवार यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केले होते. दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यात स्वाभिमानी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊनही बारामती विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांचे नाव जाहीर होत नसल्याने ऐनवेळी शरद पवार दुसरा उमेदवार देतात की काय, असा सवाल व्यक्त केला जात होता. युगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आता बारामतीच्या रणांगणामध्ये पवार विरुद्ध पवार अशी काका पुतण्यांची लढत होणार आहे. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात राज्यसभा सदस्य व अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांचा मेळावा आयोजित करून त्यांच्याशी संवाद साधला. या मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून बारामती शहरासह तालुक्यात विविध महिलांचे मेळावे आयोजित करण्यात आले. युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून देखील कार्यकर्ते मेळावे, महिला मेळावे घेण्यात आले. सध्या युगेंद्र पवार तालुक्यातील विविध गावातील वाड्यावर असताना भेट देऊन जनतेशी संवाद साधत आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार व पदाधिकारी घोंगडी बैठका आयोजित करून प्रचारात सक्रिय झाले आहेत.






