कसब्यात भाजपचा सावध पवित्रा (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: पाेटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपकडून कसब्यातील उमेदवार ठरविताना सावध पावले टाकली जात आहेत. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यास प्रथमच एवढा विलंब झाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाताे. २०१९ पर्यंत दिवगंत खासदार गिरीष बापट यांनी पाच वेळा या मतदारसंघात विजय मिळविला. बापट यांच्यानंतर मुक्ता टिळक या २०१९ मध्ये या मतदारसंघातून आमदार झाल्या. परंतु प्रदिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. या ठिकाणी झालेल्या पाेटनिवडणुकीत काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर पुणे शहर काॅंग्रेसला आत्मविश्वास मिळाला. यावेळी धंगेकर यांच्यासाेबत ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस असे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते हाेते. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतल्याचे चित्र त्यावेळी निर्माण झाले हाेते. या पाेटनिवडणुकीत भाजपकडून काही चुका झाल्या, त्यावर वरीष्ठ पातळीवर चर्चाही झाली.
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर माेहाेळ यांना पंधरा हजाराचे मताधिक्य मिळाले. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पाेटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने यांच्या नावाची चर्चा आहे. यातच ब्राम्हण समाजाला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. पाेटनिवडणुकीत भाजपने ब्राम्हण उमेदवार न दिल्याचा फटका बसल्याचेही एक पराभवामागील कारण आहे. याचाही विचार सध्या उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा केली जात आहे.
रासनेंचा जनसंपर्कावर भर
पराभव झाल्यानंत रासने यांनी पुन्हा एकदा जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला. त्यांनी विविध पक्षीय पातळीवर आयोजित केल्या जाणारे कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. तसेच सामाजिक उपक्रम राबवून, वैयक्तीक प्रश्न साेडविण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा: “वडगाव शेरीमधील जनता…”; उमेदवारी जाहीर होताच बापूसाहेब पठारेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
धंगेकरांची आक्रमक प्रतिमा
काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. ससुन रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट, हिट अँड रन प्रकरण आदी प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले आहे. यामुळे ते सातत्याने चर्चेत राहीले आहेत. याचाही विचार भाजपच्या नेत्यांना करावा लागणार आहे.
तिसरा उमेदवार काेण ?
भाजपने २८ वर्ष या मतदारसंघात प्रतिनिधीत्व केले आहे . कसबा पाेटनिवडणुक झाली तेव्हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली हाेती. मात्र, त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत तिसऱ्या उमेदवाराने घेतलेली मते ही निर्णायक ठरली आहेत. याच पद्धतीने भाजपकडून यावेळी व्यूहरचना केली जाणार का ? हा देखील उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.






