राजेगाव : राजेगाव परिसरात एकेकाळी भीमा नदीच्या (Bhima River Bank) तीरावर असंख्य जातींच्या पक्षांचे वास्तव्य निर्माण झाल्याने भीमा नदीचा (Bhima River) संपूर्ण पट्टा हा पक्षांना पाहण्यासाठी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत होता. राजेगाव येथे दरवर्षी या परिसरात दाखल होत असलेले परदेशी पाहुणे बघ्यांचे लक्ष वेधून घेत होता. मात्र, पक्षी सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेल्या पक्षीप्रेमींना मृत पक्षांचे अवशेष पाहून परतावे लागत आहे.
वाढत्या औद्योगिकरणाला प्रतिकार करत अनेक वेगवेगळ्या जातींच्या पक्षांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागत आहे. नदीचे वाढते प्रदूषण, जलपर्णी, वाळू उपशासाठी वापर होत असलेल्या यांत्रिक बोटींचा कर्कश आवाज, दिवसेंदिवस गढूळ होत असलेले पाणी, मासेमारीसाठी परप्रांतीयांचे नदी पात्रात दाखल होत असलेले तांडे आदींमुळे नदी काठावरील पक्षांच्या वसाहतीला ग्रहण लागले आहे. मात्र पक्षांच्या या प्रजातींना वाचवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभाग तसेच पर्यावरण विभाग असमर्थ ठरत आहे.
पक्षांचे वास्तव्याचे प्रमाण घटले
एकंदरीत भीमा नदीच्या पट्ट्यात दरवर्षी असंख्य विविध जातीचे परदेशी पक्षी विणीच्या हंगामात वास्तव्यास येतात आणि अंडी उबवतात मात्र हजारो किमीवरून आलेल्या या परदेशी पाहुण्यांना संरक्षण देण्याएवजी त्यांच्या जीवितावर घाला घातला जात आहे. यामुळे या पक्षांचे वास्तव्याचे प्रमाण कमी झाले असून परदेशी पक्षांनी या भागाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्षांच्या बचावासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. एकेकाळी या भागात निर्माण झालेली परदेशी पाहुण्यांची वसाहत नष्ट झाल्याने पक्षीप्रेमींसाठी ही एक चिंतेची बाब आहे.