पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन वाद झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मतदान केंद्रामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल, पर्स, पिशवी असे सामान घेऊन जाण्यास मनाई आहे. यासाठी मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून मोबाईल घेऊन जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मात्र याच कारणावरुन पिंपरी चिंचवडमधील काही मतदार केंद्राबाहेर वाद झाल्याचे देखील दिसून आले आहे.
हे देखील वाचा : लोकशाहीचा कणा कमकुवत; मतदानाच्या दिवशीच EVM बंद पडल्याने संशय
पिंपरी चिंचवडमधील काही भागांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी द्यावी असे काही जणांनी सांगितले. यासाठी त्यांची केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली. यामुळे अनेक केंद्राबाहेर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई असल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले आहे.
हे देखील वाचा : नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मतदार मोठ्या उत्साहाने आले होते. मात्र काही मतदारांचा हिरमोड झाला. कारण काही मतदार केंद्रावर मशीन बंद पडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. नेहरुनगर, चिंचवडगाव येथील मतदार केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला. तसेच प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये देखील मशीन बंद पडल्याचा प्रकार
पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यामध्ये देखील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार घडला आहे. प्रभाग २६ अंतर्गत स्वारगेट पोलिस लाईन, सेंट हिल्डाज स्कूलमधील दोन मतदान केंद्रे, सावित्रीबाई फुले स्मारक, घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका आणि महात्मा गांधी उर्दू शाळा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळच्या वेळेत मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे असताना यंत्रे अचानक ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही मतदारांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्याचे सांगितले, तर काहींनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्र सोडल्याचीही चर्चा आहे.






