पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उद्या सायंकाळी चार वाजता पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान हे मॉकड्रिल केवळ खबरदारीचा उपाय म्हणून होत असून, यावेळी जे भोंगे वाजतील त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. असे आवाहन ही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कारवाईचे मोठे संकेत दिले आहेत. सध्या भारत पाकिस्तान युद्धाची जोरदार चर्चा सर्वत्र आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशात 244 ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून किंबहुना युद्ध झाल्यास काय खबरदारी घ्यावी यासाठी हे मॉकड्रिल केले जात आहे.
केंद्र शासनाच्याच्या सूचनेनुसार आज राज्य शासनाने या मॉकड्रिलच्या तयारीसाठी बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रात पुणे, ठाणे, रत्नागिरी, मुंबई व सिंधुदुर्ग येथे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. पुणे शहरात विधान भवन येथे व जिल्ह्यात तळेगाव नगरपरिषद व मुळशी पंचायत समिती येथे हे मॉकड्रिल सायंकाळी चार वाजता होईल. यामध्ये लष्कर, पोलीस, एअर फोर्स, अग्निशामक दल, आरोग्य यंत्रणा, महसूल विभाग, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट आदी यंत्रणा सहभागी होणार आहेत.
युद्ध झाल्यास जर देशात कुठेही लष्करी हल्ला झाला तर, कमीत कमी कालावधीत मदत कार्य कसे पोहोचवता येईल व उद्भवलेल्या आपत्तीमध्ये सर्वसामान्यांना कसे संकट मुक्त करता येईल यासाठी हे मॉकड्रिल होत आहे. या मॉकड्रिलमध्ये केवळ मदतकार्य, काय खबरदारी घ्यावी याबाबत सराव होणार आहे. युद्धच्या वेळी अनेकदा मोठ्या शहरामधील महत्वाच्या इमारती व शासकीय कार्यालये लक्ष होतात. त्यामुळे मॉकड्रिलसाठी शहरात विधानभवन निवडण्यात आले आहे.
मॉकड्रिलवेळी शहरात ब्लॅकआऊट नाही
पुणे शहरात उद्या सायंकाळी चार वाजता मॉकड्रिल होणार असून, यावेळी कुठेही ब्लॅकआऊट म्हणजेच लाईट घालवली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. मॉकड्रिलवेळी बचत कार्य, रेसक्यू ऑपरेशनचा सराव घेतला जाणार आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसारच हे मॉकड्रिल पार पडणार आहे मॉकड्रिलसाठी तीन तासाचा वेळ दिला असला तरी मदत कार्य हे लवकरात लवकर कसे करता येईल हे पाहून एक ते दीड तासात हे सर्व मॉकड्रिल संपन्न होईल. शहरांमध्ये सध्या 76 ठिकाणी सायरन म्हणजेच भोंगे आहेत. 1965 च्या युद्धामध्ये हे बसवण्यात आले होते त्यावेळी ते वाजवले गेले होते. मात्र उद्या होणाऱ्या मॉकड्रिल वेळी केवळ तीन ठिकाणी म्हणजेच विधान भवन, मुळशी पंचायत समिती व तळेगाव नगरपरिषद येथे सायरन वाजणार आहे.