पुण्यात 15 हरणांचा मृत्यू (फोटो- istockphoto)
पुणे: राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 15 चितळ प्रकारातील हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पुणे महानगरपालिकाही चक्रावून गेली आहे. प्राथमिक माहितीनुसार, यामागे एखाद्या साथीच्या आजाराची शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. प्राणीसंग्रहालयात एकूण 98 चितळ प्रकारातील हरणे होती, त्यापैकी 15 हरणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे 4 ते 5 दिवसांपासून हा प्रकार सुरु असताना महापालिका प्रशासाने हि माहिती सपवण्याच प्रय़त्न केल्याचे दिसून येत आहे.
मृत हरणांचे शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशु रोग तज्ञांनी केले आहे. तसेच, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेच्या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा पैलू तपासला जात आहे. जर हा साथीचा रोग असेल, तर त्याचा मनुष्यावर काही परिणाम होऊ शकतो का, याचीही तपासणी केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.
गेल्या चार ते पाच दिवसात आमच्याकडील एकूण 16 हरणांचा अचानक मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे या घटनांच्या मृत्यूबाबत विविध पातळ्यांवर तपासणी केली जात आहे, शहरातील आणि शहराबाहेरील काही महत्त्वाच्या नामांकित प्रयोगशाळांना जैविक नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल तीन चार दिवसात आम्हाला प्राप्त होईल हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेमाचे नेमके कारण स्पष्ट होईल.
– डॉ. घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी
प्राणीसंग्रहालय, पुणे विधानसभेत आमदार रासनेंनी विचारला प्रश्न कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मागील मागील चार ते पाच दिवसांत तब्बल 15 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विषाणूजन्य आजाराने हरणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार हेमंत रासने यांनी हरणांच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत मांडत प्रशासनाने इतर प्राण्यांना धोका होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय गेली दोन दिवसात 15 हरणांचा अचानक मृत्यू झाला असून अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. साथीच्या रोगामुळे असे झाल्याची शक्यता आहे, त्यामुळे इतर प्राण्यांना त्याचा काही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तातडीने शासनाने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत” अशी मागणी रासने यांनी केली आहे.