शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन
शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी आणि माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे यांचे निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी मंगळवारी रात्री ११:३० वाजता अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन ही अत्यंत दुःखद व मनाला वेदना देणारी घटना आहे. प्रकाश देवळे यांच्या पार्थिवावर २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या जाण्याने केवळ एका राजकीय नेत्यालाच नव्हे, तर एक सामाजिक कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ आणि सच्चा माणूस गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे यांचे मूळ गाव पुणे होते. त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले होते. पुण्याजवळील शिरगाव या गावात त्यांनी २००१ मध्ये प्रतिशिर्डी साई मंदिर उभारून अनेकांच्या श्रद्धेचे केंद्र निर्माण केले.
कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश केशवराव देवळे हे 1996 मध्ये शिवसेनेतर्फे विलासराव देशमुख यांचा पराभव केला आणि विधान परिषदेवर निवडून आले. शिवसेनेच्या पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द विशेष लक्षवेधी ठरली.
बांधकाम व्यावसायिक, ऑर्केस्ट्रा कार, सिनेमा निर्माते व दिग्दर्शक, राजकारणी आणि प्रतिशिल्पकार—अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी आपले ठळक योगदान दिले. अलीकडेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा “समाज भूषण” पुरस्कार देऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनेक संस्था व संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता.