महिला रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी आधारवड, एकमेव रुग्णालयाचे अधिक्षक; जाणून घ्या सामर्थ्य
मुंबई/नीता परब: शारदीय नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचे जागर करणाऱ्या नवरात्र उत्सवाची महती. महिलांच्या सामर्थ्याचा गौरव.. त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती प्रदान करते. महिलांचे आराेग्य व सक्षमीकरणासाठी महिलांसाेबत पुरुषांचीही महत्वाची भूमिका असते. असेच, महिलांसाठी अखंडितपणे आराेग्यसेवा देण्याचा वसा घेतलेले राज्य सरकारचे एकमेव महिलांसाठी असलेले कामा व आल्ब्लेस रुग्णालय.. या रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. तुषार पालवे मागील पाच वर्ष कामा रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांच्या आराेग्या संदर्भात विविध सेवा देण्याचे अविरत कार्य करत आहेत. डाॅ. तुषार पालवे निष्णात प्रसूतीशास्त्र व स्त्रीराेगतज्ञ, उत्तम प्रशासक असल्याची ख्याती आहे.
२६ मार्च २०२० रोजी कामा व आल्ब्लेस रुग्णालयाच्या अधिक्षक या पदावर आणि ते ही रुग्णालयाच्या स्थापनेपासून पहिले पुरुष अधीक्षक अशी नोंद आहे. एक बहुआयामी ,चतुरस्त्र असं व्यक्तिमत्व. कधीही आणि कुठल्याही कठीण परिस्थितीत आलेली जबाबदारी स्वीकारण्याची आणि ती तितक्याच समर्थपणे लीलया पेलण्याची समर्पकता त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी कणकवलीच्या एसएम कॉलेजमधून १९९४ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. १९९९ मध्ये त्यांनी राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे, मुंबई येथून एमबीबीएस पूर्ण केले. २००५ मध्ये त्यांनी प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रात एमडी पूर्ण केले.
कोविड काळातील कार्य: कोविड काळामध्ये त्यांनी स्वीकारलेली कामा अँड आल्ब्लेस रुग्णालयाची जबाबदारी तेवढ्याच ताकदीने पेलून दाखवली आणि यशस्वीरित्या पारही पाडली. नॉन कोविड रुग्णालयांमध्ये समाविष्ट असलेले कामा रुग्णालय प्रसुतीसाठी काेिवड-१९ संसर्गित महिला येणे सुरू होताच काेिवड-१९ घोषित रुग्णालयांमध्ये प्रवेशित झाले. रुग्णालय प्रमुख आणि कोविड-१९ चे नोडल ऑफिसर म्हणून खरा कसोटीचा काळ हाेता. पण अतिशय खंबीर आणि संयमित वृत्तीने कमी मनुष्यबळ, अपुरी साधन सामुग्री आणि भीतीचे वातावरण असताना, कुठलीही पूर्वतयारी नसताना उपलब्ध मनुष्यबळ, उपलब्ध साधनसामग्री आणि उपलब्ध जागा या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा योग्य रीतीने वापर करून नॉन कोविड पेशंट सोबतच कोविड पॉझिटिव्ह पेशंटचे अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करून त्यांना चांगल्या प्रतीचे उपचार आणि सेवा उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी झाले. आणि त्यामुळेच मे २०२० पासून ते आज पर्यंतच्या जवळजवळ चौथ्या लाटेपर्यंत १५९७ पेक्षा अधिक कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना तसेच ६० पेक्षा अधिक बाळांना ०.०६ मृत्युदर ठेवून बरे करण्यात रुग्णालयास यश आले.
रुग्णालयामध्ये व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू केले आणि रुग्णालयामध्ये स्मार्ट ओपीडीचे आयोजन केले आणि त्यात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दिवसाला ४० ते ५० स्वाब्सचे स्वतः कलेक्शन केलेले आहे. दीड वर्षांच्या कालावधीमध्ये दीड लाखाहून अधिक लाभार्थींना कोविड-१९ व्हॅक्सिनेशन दिले आहे. विविध शिबिरे आयाेजित करत साधारण सतरा हजारांपेक्षा अधिक लाभार्थींना लसीकरण देऊन जागतिक लसीकरण मोहिमेला हातभार लावलेला आहे.
१३० वर्षांचा वारसा लाभलेल्या या रुग्णालयामध्ये त्यांनी प्रथमतःच हाय डिपेंडन्स युनिट ( एचडीयू) तयार करण्याचे धाडसी पाऊल उचलले आणि उपलब्ध मनुष्यबळ वापरून ते एका वर्षात व्हेंटिलेटर, मॉनिटर्स , सिरींज पंप आणि इन्फ्युजन पंप सारख्या अद्ययावत यंत्रसामुग्री आणि सुविधां सहित प्रत्यक्ष सुरु करण्यात आल्या. या युनिटमुळे सप्टेंबर २०२१ ते अद्याप पर्यंत जवळजवळ दीड हजारांहून अधिक अत्यावश्यक सेवेची गरज असणाऱ्या रुग्णांना लाभ मिळाला आहे.
डाॅ.तुषार पालवे यांच्या पुढाकाराने कामा रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राने महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयातील पहिले केंद्र असा मान पटकावला आहे. आयव्हीएफ केंद्राने वंध्यत्व उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. याशिवाय युरो गायनॅक विभाग सुरु करण्यात आला असून स्त्रियांच्या मूत्राशय, मूत्रमार्ग व इतर आराेग्य समस्यां संबंधीत विभाग सुरु करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून बंद पडलेला रेडिएशन थेरपी या विभागाला देखील नवीन उभारी देण्यात आली आहे.
महिलांमध्ये वाढते ब्रेन फॉगची समस्या! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी
समाजाचे उत्तरदायित्व व महिलांच्या विविध आजारांसाठी ख्याती असलेल्या रुग्णालयाला पूर्णतः प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने समाजातील अत्याचारीत आणि पिडित महिलांसाठी कामा रुग्णालयामध्ये वन स्टॉप सेंटरचे काम अंतिम टप्प्यात सुरु असून येत्या काही दिवसातच हे सेंटर रुग्णसेवेत दाखल हाेईल.
नवीन विभागांसोबतच रुग्णालयामधील नवजात अर्भक अति दक्षता विभाग , प्रसुती विभाग आणि शस्त्रक्रिया विभागांचे नव्या स्वरूपात रूपांतर करण्यात आले आहे.तसेच प्रसुती पश्चात कक्ष, प्रसूतीपूर्वकक्ष , बाल रूग्ण विभाग, इमर्जन्सी विभागांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.रुग्णालयात ४५० महिला कर्मचारी आजघडीला कार्यरत आहेत. यात साधारण ३५० परिचारीका आहेत तर उर्वरित इतर तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत.