इंदापूर विधानसभा कार्यक्षेत्रातील मतदार धर्मनिरपेक्ष पक्षाशी जवळीक असणारा मतदार म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत शरद पवार देतील त्या उमेदवाराला येथून भरघोस मतदान होते. तर विधानसभेला उमेदवार पाहून मतदान होते.
सिद्धार्थ मखरे, इंदापूर: येत्या २० नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील ३ लाख ३६ हजार ६४३ मतदार विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. तिरंगी लढतीचे सावट या निवडणुकीवर आहे. ती दुरंगी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार कोणती युक्ती योजणार याची उत्सुकता तालुक्यातील मतदारांना लागून राहिल्याचे सध्याचे चित्र आहे.
दहा वर्षाच्या राजकीय वनवास संपवण्यासाठी ‘मी परत येईन’ हे वाक्य उराशी बाळगत,शरद पवार यांच्या पक्षाबरोबर समझोता करुन,मतांची बेगमी करण्यासाठी तडफेने निघालेले हर्षवर्धन पाटील व दहा वर्षांत केलेली कामे आपली सत्ता अबाधित ठेवतील या विश्वासाने विधानसभेचा गड काबीज करण्याचे स्वप्न पहाणाऱ्या आ.दत्तात्रय भरणे या दोघांना ही आप्पासाहेब जगदाळे,प्रवीण माने व भरत शहा यांच्या तिसऱ्या आघाडीने विचार करण्यास भाग पाडल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
इंदापूर विधानसभा कार्यक्षेत्रातील मतदार धर्मनिरपेक्ष पक्षाशी जवळीक असणारा मतदार म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत शरद पवार देतील त्या उमेदवाराला येथून भरघोस मतदान होते. तर विधानसभेला उमेदवार पाहून मतदान होते. त्यात ही ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराला मतदान करायचे हा शिरस्ता १९५२ पासून २००६ पर्यंत पाळला जात असे.शरद पवारांनी दिलेला उमेदवार ‘लादला’ गेला असेल तर त्याला बाजुला सारण्याची इथल्या मतदारांची मानसिकता आहे. इथल्या मतदारांनी थेट भाजप वा शिवसेनेचा उमेदवार कधी ही निवडून दिलेला नाही. १९९५ पासून २००९ पर्यंत हर्षवर्धन पाटील लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत होते. अपक्ष म्हणून निवडून गेल्यानंतर ज्यांची सत्ता येईल त्यांच्याशी समझोता करण्याच्या सोयीच्या राजकारणामुळे हर्षवर्धन पाटील नंतरच्या काळात महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तरी, येथील मतदारांनी ते चालवून घेतले होते. मात्र त्यांनी २०१९ मध्ये भाजपकडून निवडणुक लढवल्यानंतर त्यांना पराभूत व्हावे लागले असा तालुक्यातील विधानसभा निवडणूकांचा इतिहास आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळे यांना शहरातून दोन हजार मतांचे लीड देवू असे जाहिर करुन तेवढे लीड भरत शहा यांनी मिळवून दिले होते.त्यामुळे आपल्या उमेदवाराला जास्तीत-जास्त मते कशी मिळवून देता येतील, नापसंत उमेदवार कसा पराभूत करता येईल याचे आडाखे त्यांनी पक्के केले आहेत.तर इंदापूर विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी सत्तारूढ आमदाराला पराभूत करु शकते ही बाब १९९५ ला स्पष्ट झाली होती.नेमकी हीच परिस्थिती विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ओढवलेल्या तिसऱ्या आघाडीतून शरद पवार कसे मार्ग काढणार, हर्षवर्धन पाटील काय करणार व मागील दोन महिन्यांपासून निवडणुकीबाबत कोणते ही विधान न करता लियोनार्दो दा विंचीच्या ‘मोनालिसा’सारखे गुढ स्मितहास्य करत असणारे आ. दत्तात्रय भरणे कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इंदापूर विधानसभा २०२४ करिता एकूण मतदार संख्या ३ लाख ३६ हजार ६४३ एवढे आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ७२ हजार ८१५ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या १ लाख ६३ हजार ८१३ एवढी आहे. तृतीय पंथीयांचे १५ मतदान आहे.
Web Title: Harshvardhan patil dattatraya bharan challenge for third front in indapur nras