वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार रासने यांचा पुढाकार (फोटो - ट्विटर)
पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रस्तावास गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. परिणामी, वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग हे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार असून, पुणेकरांसाठी हा एक महत्त्वाचा बदल ठरेल.या प्रस्तावास गती देण्यासाठी हेमंत रासने यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भोसले यांनी दिले आहे. तसेच, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा शब्द दिल्याची माहिती रासने यांनी दिली आहे. खडक येथील रखडलेल्या मामलेदार कचेरीच्या बांधकामाला गती देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची देखील अधिवेशना दरम्यान भेट घेऊन खडकमाळ येथील पोलिस वसाहतीच्या जीर्ण झालेल्या इमारतींची नव्याने उभारणी करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.
आमदार हेमंत रासनेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
‘स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’ अशी घाेषणा करीत आमदार हेमंत रासने यांनी मतदारसंघ ‘फ्लेक्समुक्त’ करण्याची घाेषणा केली आहे. त्यांच्या या आवाहनाला भाजपचे कार्यकर्ते प्रतिसाद देतील का ? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. एकही अनधिकृत फ्लेक्स उभारला जाणार नाही, तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ( ता. २६ ) मतदारसंघात २६ ठिकाणी ‘स्वच्छता नारायण’ महापुजा आयाेजित केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
आमदार म्हणून निवडुन आल्यानंतर रासने यांनी कसबा मतदारसंघातील स्वच्छतेचा प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. देशात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदाैर शहराचा त्यांनी महापािलकेचे सफाई कर्मचारी, अधिकारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदींचा अभ्यास दाैराही आयाेजित केला हाेता. या दाैऱ्यात इंदाैर शहर हे प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर झाल्याचे निदर्शनास आले हाेते, असे नमूद करीत रासने यांनी पत्रकार परीषदेत कसबा मतदारसंघात यापुढे सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याचा निर्णय मी घेतल्याचे जाहीर केले. शहरातील स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास या निर्णयामुळे मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.