सौजन्य - सोशल मिडीया
सासवड : पुरंदर तालुक्यात विमानतळ प्रकल्प जाहीर झाल्यापासून जमिनींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विमानतळ परिसरातील गावांमध्ये किमान एक गुंठा जमीन तरी असावी, यासाठी बाहेरील गुंतवणूकदारांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच जमीन खरेदी-विक्रीतील एजंट आता थेट घरोघरी पोहोचले असून, एक, दोन आणि पाच गुंठ्यांच्या प्लॉटची माहिती देणारी पत्रके नागरिकांना वाटत आहेत.
पुरंदरचा पूर्व भाग दुष्काळी असल्याने पूर्वी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे जमिनी कमी भावात विकाव्या लागल्या. या संधीचा फायदा घेत काही गुंतवणूकदारांनी एकरांपासून शेकडो एकरांपर्यंत जमीन खरेदी करून ठेवली. त्यानंतर जमिनींचे प्लॉटमध्ये विभाजन करून तसेच गुंठेवारीच्या माध्यमातून विक्री करून मोठा नफा कमावल्याचे चित्र आहे. सध्या पुरंदर तालुक्यात विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. एका बाजूला शेतकऱ्यांकडून जमीन घेऊन त्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे जमीन खरेदी-विक्री करणारे एजंट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी आणि पारगाव या परिसरात जमीन मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांची धावपळ सुरू आहे.
घरोघरी माहितीपत्रके
विमानतळ परिसरात पूर्वी जमीन खरेदी करून ठेवलेल्या काहींनी आता तिचे लहान प्लॉट करून विक्रीसाठी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून घरोघरी माहितीपत्रके वाटली जात आहेत. ‘विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर’, ‘विमानतळाच्या हाकेच्या अंतरावर’, ‘जेजुरी, सासवड, हडपसर, यवत, उरुळीपासून जवळ’ अशा स्वरूपातील जाहिराती करून एक, दोन आणि पाच गुंठ्यांचे प्लॉट घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कर्जाचीही हमी
प्लॉट खरेदीसाठी पैसे नसल्यास बँकेकडून कर्ज मिळवून देण्याची हमीही काही एजंटांकडून दिली जात आहे. मोठ्या क्षेत्राची जमीन विकण्यास शेतकरी तयार नसल्याने गुंठेवारी करून विक्री करण्याचा व्यवसाय वाढल्याचे दिसून येत आहे. या क्षेत्रात नव्या युवकांचीही एन्ट्री झाली असून, उपलब्ध जमिनीची जाहिरात करून ग्राहक शोधण्याचे काम सुरू आहे.
स्थानिकांसाठी जमीन महागण्याची भीती
विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे दर आधीच मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भविष्यात हे दर आणखी वाढल्यास प्रकल्पबाधित गावांतील सर्वसामान्य शेतकरी किंवा स्थानिक नागरिकांना एक-दोन गुंठे जमीन खरेदी करणेही कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुंतवणुकीच्या उद्देशाने बाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्याची शक्यता वाढल्याने स्थानिक लोकसंख्येचे प्रमाण कमी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.






