Maratha Reservation: देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी मराठा आंदोलक ताब्यात; पुण्यात नेमकं घडलं काय?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणामुळे राज्यात राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनामुळे राज्यात ठिकठिकाणी उपोषणाची धग पोहचू लागली आहे. मराठा आंदोलकांकडून आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत. जरांगेच्या उपोषणाचे वारे पुण्यातही पोहचले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वी पुणे पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस पुण्यातील सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात ते पुणे शहरातील अनेक मंडळांच्या गणेश मूर्तींचं दर्शन घेऊ शकतात. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पण त्याचवेळी फडणवीसांच्या दौऱ्या पूर्वी काही मराठा आंदोलक कार्यक्रमाच्या रस्त्यावर जमले होते. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरून पाहणी करताना दिसत आहेत. सिंहगड रस्त्याकडून राजाराम पुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच लोकार्पण कार्यक्रमाच्या परिसरातून काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने, मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे, मुंबईत मराठा आंदोलकांना येऊ देऊ नका असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. दरम्यान, मुंबईत संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला असून आंदोलकांनी न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत, या आंदोलकांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आले आहेत, असं न्यायमूर्तींनी स्वत: सांगितलं आहे. तसेच मराठा आंदोलक अजूनही मुंबईत येत आहेत. त्यांना कसं अडवणार, अशी विचारणाही न्यायालयाकडून केली जात आहे. त्याचवेळी आजच्या सुनावणी न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच सुनावलं आहे. सुनावणीदरम्यान हायकोर्टाच्या बाहेर मराठा आंदोलक अनेक ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळालं.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणासंदर्भातील अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या अर्जाच्या सुरुवातीलाच आमरण उपोषणाचा उल्लेख असून, नियमांनुसार आमरण उपोषणास परवानगी नसल्याने न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत विचारणा केली आहे.
अर्जाच्या खाली जरांगे पाटील यांची सही आहे का, तसेच त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे का, अशा दोन महत्त्वाच्या प्रश्नांची विचारणा न्यायालयाने सरकारला केली. यापूर्वी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते, मात्र ती कार्यवाही पूर्ण झाली का याबाबतही सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.