महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दिला अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज (फोटो- istockphoto)
पुणे: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सून लवकर भारतात दाखल झाला आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. पुण्यात देखील पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली होती. मात्र गेले दोन ते तीन दिवस पुण्यातपवसणे विश्रांती घेतली होती. आज सकाळी अचानक पावसाने पुणे शहरात हजेरी लावली आहे.
पुणे शहरात कडक उन्हाळा जाणवत असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडल्याचे दिसून आले. तसेच हलक्या सरी कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस पुणे शहरासह राज्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहरातील पेठ भागात आणि उपनगरात पावसाने सकाळच्या सुमारास हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुण्यात हजेरी लावल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार
येत्या काही दिवसांत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूयाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. येत्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही भागांत पावसाचा जोर मंदावला
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस काहीसा कमी झाला. पुरंदर तालुक्यातील अति पावसाच्या भागासह दुष्काळी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. जनजीवन ठप्प झाले होते. नंतर, सायंकाळपासून सासवड, जेजुरी, वाल्हे, परिंचे, नीरा या भागात उघडीप दिली आहे. या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे झालेल्या नुकसानीची पंचनामे आता महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगात सुरू केले आहेत.
राज्यातील काही भागांत पावसाचा जोर मंदावला; पुरंदर तालुक्यात पिकांचे पंचनामे सुरू
पुरंदर तालुक्यातील शेतकरी व गोपालक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा पिके करतात. परंतु अवकाळी पावसाची यंदा मोठी झळ या चारा उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. आठवड्याभरात कोसळलेल्या धुवांधार पावसाने हाताशी आलेले चार पिक शेतकऱ्यांना गमवावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मका, व्हंडी, कडवळ, घास हे पिक नष्ट झाल्यामुळे त्यांच्या जनावरांच्या पुढील चार महिन्यांसाठी चाऱ्याची सोय नव्याने करावी लागणार आहे.