देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. लाखो विद्यार्थी या शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात. दरम्यान देशभरातून हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन पुण्यनगरीत येतात. मात्र या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करावे लागते. काल रात्रीपासून पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करत आहे. दोन पेपर एकाच दिवशी आल्याने हे विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत आहेत.
आयबीपीसी आणि एमपीएससीचे पेपर एकाच दिवशी आल्याने एक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. पुण्यातील नवीन पेठेत असणाऱ्या अहिल्या वाचनालयासमोर हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यानंतर सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे.
📍पुणे
⏭️ 21-08-2024➡️ राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून लाईव्ह https://t.co/HFcnnwlhiy
— Supriya Sule (@supriya_sule) August 21, 2024
दरम्यान या ठिकाणी आंदोलकांची चर्चा केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ”परीक्षा घेण्याला या विद्यार्थ्यांचा विरोध नाही. पण सर्व परीक्षा वेगवगेळी घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागणी असतील त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन.” दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत.
तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 21, 2024
देवेंद्र फडणवीस ‘एक्स’ वर म्हणाले, ”आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.” त्यामुळे आता सरकार आणि एमपीएससी आयोग याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.