सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारसभा घेत आहेत. पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ सध्या राज्यभर चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांचा सविस्तर “प्रगती अहवाल” प्रकाशित करण्यात आला. यासोबतच प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा आणि जनतेच्या हितासाठी तयार करण्यात आलेला “जनहितनामा” देखील यावेळी प्रसारित करण्यात आला.
या प्रगती अहवालात प्रभाग क्रमांक ९ मधील पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी राबवलेले उपक्रम, तसेच पुढील काळात करण्यात येणाऱ्या विकासकामांचा ठोस आराखडा मांडण्यात आला आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसमावेशक आणि व्यवहार्य उपाययोजनांचा समावेश असलेला जनहितनामा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
NH-4 सर्व्हिस रोड विकासावर ठोस भूमिका
प्रभागातील दळणवळण आणि प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन नॅशनल हायवे (NH-4) सर्व्हिस रोडसह स्वतंत्र सर्व्हिस रोड विकास करण्याचा स्पष्ट निर्धार जनहितनाम्यात मांडण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल, तसेच नियोजनबद्ध बांधकाम व पर्यायी मार्ग उभारणी करून कोंडी कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
ट्रॅफिक प्लॅनिंग (ट्रॅफिक कोंडीमुक्त प्रभाग)
प्रभागातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ट्रॅफिक को-ऑर्डिनेटिंग आणि सुसूत्र ट्रॅफिक प्लॅनिंग राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत रस्ते सुधारणा, सिग्नल समन्वय, शिस्तबद्ध पार्किंग, तसेच गरजेनुसार फ्लायओव्हर/अंडरपास यांसारख्या उपाययोजना प्रस्तावित आहेत. तसेच महत्त्वाचे मिसिंग लिंक्स पूर्ण करणे आणि राधा चौक, राम इंदु पार्क, ज्युपिटर परिसर यांसारख्या प्रमुख ट्रॅफिक स्पॉट्सवर ठोस हस्तक्षेप करून कोंडी कमी करण्याचा आराखडा जाहीर करण्यात आला.
तसेच प्रभागातील मीसिंग लिंक रस्ता पूर्ण करण्याचा ही मुद्दा घेण्यात आला. प्रामुख्याने वाकड बालेवाडी रस्ता, पाषाण लिंक रोड आणि प्रभाग ट्रॅफिक कोंडी मुक्त करण्यासाठी जे आवश्यक रस्ते पूर्ण करण्याचं मुद्दा दिला आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित उमेदवारांनी स्पष्ट केले की, “प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामे अधिक गतीने पूर्ण करून नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देणे आणि दिलेली आश्वासने पूर्णत्वास नेणे हा आमचा ठाम संकल्प आहे.”






