पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल, बस थेट दुकानातच... (संग्रहित फोटो)
पुणे : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आप्पा बळवंत चौकात मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याने अचानक नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरली. या धडकेत दुकानाचे नुकसान झाले असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नेहमीप्रमाणे आप्पा बळवंत चौकात मोठी वर्दळ होती. यावेळी वडगाव ते पुणे स्टेशन जाणारी पुण्यदशम पीएमपी बस वेगाने चौकातून जात असताना ब्रेक फेल झाले. त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने थेट रस्त्याकडेला असलेल्या दुकानात शिरला. दरम्यान, दुकानाच्या दर्शनी भागातील फर्निचरचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडक बसताच परिसरात एकच मोठा आवाज झाला. ज्यामुळे नागरिक सैरावैरा धावू लागले. त्यावेळी दुकानात आणि परिसरात नागरिक उपस्थित होते. मात्र, बस दुकानात घुसताना पाहून अनेकांनी प्रसंगावधान राखत बाजूला धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसचा वेग पाहून आम्ही घाबरलो होतो, पण सुदैवाने कोणीही बसच्या खाली आले नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हेदेखील वाचा : PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग, उत्पन्न ६८ लाखांवर
या अपघातात संबंधित दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत बसचे ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा चालकाने केला आहे. मात्र, बसच्या देखभालीबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाकडून या दाव्याची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पीएमपी प्रशासनाकडून या बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून, चालकाच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे तपासानंतर स्पष्ट होईल. मध्यवर्ती भागातील या अपघातामुळे पीएमपी बसेसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दररोज 54 पीएमपी बसेस ब्रेकडाऊन
दुसरीकडे, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाते. मात्र, दररोज ५४ बसेस ब्रेकडाऊनमुळे बंद पडत आहेत. या बससेवेची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे चित्र समोर येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात सेवा देणाऱ्या पीएमपीच्या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.






