पुण्यात तापमानाचा पारा पुन्हा चढला; सकाळी दहानंतरच बसतोय उन्हाचा चटका
पुणे : यंदा शहरासह जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, ढगाळ वातावरणातही तापमानाने चाळीशी पार केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असतानाही उष्णतेचा तडाखा कायम असल्याने शहरात विरोधाभासी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. बुधवारी (दि.22) पुणे शहरात 38 अंशांवर तापमान दिसून येत आहे.
गेल्या आठ दिवसांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले असून, लोहगाव परिसर सर्वाधिक तापमानाने अक्षरशः तापला आहे. ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र जाणवत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. शहरात सध्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. मागील तीन दिवसांपासून सातत्याने उष्णतेची तीव्रता कायम असून, दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडत आहेत. सकाळी १० नंतरच सूर्याचा चटका वाढू लागतो, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. विशेषतः लोहगाव परिसरात एप्रिल महिन्यातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने या कालावधीत शक्यतो घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाताना छत्री, टोपी, गॉगल्स आणि पुरेसे पाणी सोबत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे. मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दिवसभर वातावरण अंशतः ढगाळ होते.
पुण्यात हलक्या पावसाचाही इशारा
दरम्यान, ढगाळ हवामान आणि वाढत्या उष्णतेमुळे राज्याच्या अनेक भागांत उकाडा असह्य झाला असला, तरी विजांसह पावसाच्या सरींमुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. २२) पुणे आणि परिसरात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुपारी आणि सायंकाळी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
गुरुवारी तापमान खाली येणार
गुरुवारी (ता. २३) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असून, किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहे.






