संग्रहित फोटो
पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने प्रवासी आणि वाहनचालकांना भुरळ घातली असली, तरी या आकर्षणामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढताना दिसत आहे. बोगद्यांमध्ये आणि पुलावर वाहने थांबवून छायाचित्रे काढण्याच्या प्रकारांवर महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून, केवळ तीन दिवसांत ९५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) खोपोली ते कुसगाव दरम्यान १३.३ किलोमीटरची ‘मिसिंग लिंक’ मार्गिका उभारली आहे. या मार्गिकेचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच वाहतूक सुरू करण्यात आली. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी सुमारे ३० मिनिटांनी कमी झाला आहे.
या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदे आणि देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला असून, हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण मानला जात आहे. या बोगद्यांची नोंद गिनीज बुकमध्ये झाली असून, लिम्का बुकमध्ये नोंद व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या आकर्षक प्रकल्पामुळे अनेक वाहनचालक पुलावर आणि बोगद्यात गाड्या थांबवून फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचे दिसून येत आहे. हे कृत्य धोकादायक असून वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी अशा प्रकारांवर कारवाई सुरू केली आहे.
महामार्ग पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी १५, रविवारी ५१ आणि सोमवारी ३१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे एकूण ४७,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, एमएसआरडीसीकडून ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ बसविण्याचे काम सुरू आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनांना थेट ई-चलान पाठवले जाणार असून, त्यामुळे अशा प्रकारांवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे.
हे सुद्धा वाचा : काळजाचा थरकाप! तळेरानमधील पाझर तलावात बुडून जुळ्या बहीण- भावाचा मृत्यू
पर्यटनस्थळ नाही, महामार्ग आहे!
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) स्पष्ट केले आहे की, मिसिंग लिंक हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे एक वाहतुकीचे साधन आहे, पर्यटनस्थळ नाही. प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोठेही वाहने थांबवू नयेत, असे आवाहन एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी राहुल वसईकर यांनी केले आहे.






