सौजन्य - नवराष्ट्र टीम
ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात एक चटका लावून जाणारी घटना घडली आहे. तळेरान (ता. जुन्नर) येथील पुष्पावती नदीवरील पाझर तलावात बुडून नऊ वर्षांच्या सख्ख्या जुळ्या बहीण-भावाचा अंत झाला आहे. श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे (वय११ वर्षे) अशी या मृत चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी आणि गणेश हे दोघेही मूळचे तळेरान (वसईवाडी) येथील रहिवासी असून, ते शिक्षणासाठी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे राहत होते. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने ते आपल्या गावी वसईवाडी येथे आले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या मोठ्या बहिणीसोबत हे दोघेही पुष्पावती नदीवरील पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेले होते.
तलावाच्या काठावर खेळत असताना या दोघांचाही पाय घसरला आणि ते खोल पाण्यात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. सोबत असलेल्या मोठ्या बहिणीने व इतर मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी मोठ्या शिताफीने दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना ‘मृत’ घोषित केले.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना तळेरान गावचे सरपंच गोविंद साबळे यांनी सांगितले की, “दोन्ही भावंडे अतिशय गुणी होती. सुट्टीसाठी गावी आले असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर आभाळ कोसळले असून संपूर्ण गाव शोकाकुल आहे.
एकाच वेळी घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने वसईवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मुले नदी, नाले किंवा तलावाकाठी खेळायला जातात. पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यांना एकटे जलाशयाजवळ पाठवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा होता.
दरम्यान श्रावणी आणि गणेश यांच्या अकाली जाण्याने परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली असून, या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : भोर-रामबाग मार्गावर एसटी-कारचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी






