पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे 'सर्व्हर डाऊन'; मिळकतकराच्या उत्पन्नावर होणार परिणाम? (Photo : iStock)
पुणे : महापालिकेच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून मिळकत कर विभागाचे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे मिळकत कर भरण्यात नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. कर भरणा केंद्रांच्या बाहेर अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याचे फलक लावले आहेत. यामुळे मिळकतकराच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व्हर पूर्ववत होण्यासाठी अजून दोन दिवस लागणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत करातून दोन हजार ७०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाविष्ट गावांतील थकबाकीदारांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याने उत्पन्न कमी झाल्याचा दावा मिळकत कर विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. यामुळेच मिळकत कराचे उद्दीष्ठ गाठण्यासाठी मिळकत कर विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.
आर्थिक वर्ष संपण्यास तीन आठवड्यांचा कालावधी राहिल्याने मिळकत करभरणार्या मिळकत धारकांची संख्या वाढत आहे. अशातच गेल्या पाच दिवसापांसून मिळकत कर विभागाचे सर्व्हर डाऊन असल्याने कर भरण्याचे काम थांबले आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने कर्मचारी व नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोमवारपर्यंत सर्व्हर पूर्ववत होईल
याबाबत महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘मिळकत कर विभागाची कर भरण्यासाठी वापरली जाणारे सॉफ्टवेअर जुने आहे. वारंवार येणार्या तांत्रिक अडचणींवर सध्या काम सुरू आहे. सोमवारपर्यंत सर्व्हर पूर्ववत होईल’.