जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीमध्ये काळी जादू टोणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे (फोटो - सोशल मीडिया)
Pune Political News : पुणे : आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच लोकशाहीच्या उत्सवावर अंधश्रद्धेची काळी छाया पडताना दिसत आहे. प्रचार, सभा, आरोप-प्रत्यारोप यांच्या पलीकडे जाऊन आता ग्रामीण भागात उतारे, जादूटोणा, करणी, काळी जादू अशा प्रकारांमुळे भीती आणि संशयाचे वातावरण तयार होत आहे. भोर तालुक्यात घडलेला प्रकार हा केवळ एक उदाहरण असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अशाच घटना सातत्याने घडत असल्याची चर्चा आहे.
ग्रामीण भागातील गावोगावी मध्यरात्री घरांसमोर, चौकात किंवा रस्त्यांच्या कडेला लिंबू, बिबवे, गुलाल, बुक्का, हळद-कुंकू, करडई आदी साहित्य ठेवलेले ‘उतारे’ आढळून येत आहेत. सकाळी नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच गावांमध्ये खळबळ उडते. आजही ग्रामीण समाजमनात अशा गोष्टींबाबत भीती आणि गैरसमज खोलवर रुजलेले असल्याने अनेक कुटुंबे मानसिक दबावाखाली येत आहेत.
हे देखील वाचा : जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी ; बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं
मतांसाठी भीतीचे राजकारण?
हे प्रकार निवडणूक आचारसंहितेच्या काळात घडत असल्याने त्यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. थेट प्रचार न करता मतदारांच्या मनात भीती निर्माण करून त्यांचे मानसिक वशीकरण करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. काही भागांत ‘विरोधकांना मानसिक धक्का देण्यासाठी’ किंवा ‘गावात संभ्रम पसरवण्यासाठी’ हे प्रकार मुद्दाम घडवले जात असल्याची चर्चा आहे.
पुणे जिल्ह्याचा ग्रामीण पट्टा सामाजिकदृष्ट्या प्रगत मानला जात असला, तरी निवडणुकीच्या काळात अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांचे पुनरागमन होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. काही गावांमध्ये तरुणांनी पुढाकार घेऊन हे उतारे काढून टाकले असले, तरी भीतीचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही.
हे देखील वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेणं टाळलं! पण अर्थमंत्री सीतारमण यांनी 24 वेळा केला टॅरिफचा उल्लेख
अंधश्रद्धेला थारा नको – तज्ज्ञांचा इशारा
या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चिंता व्यक्त केली आहे. राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरुण बुरांडे यांनी ग्रामस्थांना घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट केले. “लिंबू, बिबवे, उतारे यामुळे कोणतेही अमंगल होत नाही. निवडणुकीच्या काळात लोकांच्या भावना भडकवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. नागरिकांनी विवेक सोडू नये,” असे त्यांनी सांगितले.
प्रशासन गप्प का?
धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील अनेक भागांत असे प्रकार घडूनही बहुतांश ठिकाणी पोलीस तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. भीती, बदनामीची धास्ती आणि अंधश्रद्धेमुळे नागरिक गप्प राहतात. मात्र, या शांततेचा फायदा घेत अंधश्रद्धेचे राजकारण अधिक बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. मात्र, या उत्सवात जर भीती, संशय आणि अंधश्रद्धेचा वापर होऊ लागला, तर त्याचा थेट परिणाम मतदानावर आणि लोकशाहीच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन, निवडणूक यंत्रणा आणि सामाजिक संघटनांनी वेळीच हस्तक्षेप करून या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






