बालगंधर्व रंगमंदिर(फोटो-सोशल मीडिया)
प्रगती करंबेळकर/पुणे : विविध कलांना आणि कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या पुण्यातील सात कलादालनांपैकी बालगंधर्व कलादालन हे सध्या प्रमुख आकर्षण ठरत आहे. बालगंधर्व रंगमंदिराची प्रतिष्ठा आणि शहरातील मध्यवर्ती स्थान या दोन कारणांमुळे या कलादालनाला रसिक आणि कलाकारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिका नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगंधर्व रंगमंदिराचे नाव केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठेने घेतले जाते. त्यामुळे अनेक कलाकार स्वतःची कला सादर करण्यासाठी बालगंधर्व कलादालनाचीच निवड करतात. याच कारणामुळे या कलादालनाचे आरक्षण दोन ते तीन महिने आधीच पूर्ण होत असून प्रतीक्षा यादीही तयार होते, असे कामठे यांनी सांगितले.
हेही वाचा : किशोर कुमारच्या बंगल्यात विराट कोहली! आलिशान रेस्टॉरंटची केली सुरवात; रोटी-खिचडीची किंमत वाचून व्हाल अवाक
सध्या शहरात बालगंधर्व कलादालन, राजा रविवर्मा आर्ट गॅलरी, यशवंतराव चव्हाण कलादालन, आण्णाभाऊ साठे कलादालन, विठ्ठल तुपे कलादालन, भिमसेन जोशी कलादालन आणि आणखी काही अशी एकूण सात कलादालने कार्यरत आहेत. मात्र बालगंधर्व कलादालन वगळता इतर ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी नूतनीकरणाची गरज आहे, तर काही कलादालने शहराच्या बाहेरील भागात असल्याने प्रेक्षकांची वर्दळ कमी असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे या कलादालनांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कलादालनांमुळे कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले आहे. सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी पुण्यातील पहिले कलादालन बालगंधर्व कलादालनाची स्थापना झाली. तेव्हापासून कलाक्षेत्रात मोठा बदल झाला आहे. पूर्वी प्रदर्शनासाठी जागेचा अभाव असल्याने अनेक कलाकारांची कला मर्यादित वर्तुळातच राहायची; मात्र आता या कलादालनांमुळे नवोदितांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात केवळ बालगंधर्व कलादालन आणि राजा रविवर्मा आर्ट गॅलरी ही दोनच कलादालने असून, त्यापैकी रविवर्मा गॅलरीचे व्यवस्थापन खाजगी कंपनीकडे आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागात आणखी कलादालने उभारावीत, अशी मागणी कलाक्षेत्रातून येत आहे.






