पुरंदर तालुक्यातील जलजीवन मिशन
सासवड /संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर आहे. यातील बहुतेक कामे अंतिम टप्प्यात आलेली केवळ कागदोपत्री दिसून येत आहेत. तर कित्येक कामांची मंजुरी आदेश असताना गाव कारभाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे ही कामे मे २०२५ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र तालुक्यातील १० टक्के गावांच्याच योजना पूर्ण असून उर्वरित कधी होतील याचा नेम नाही. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून टयांकर मागणीचे प्रस्ताव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाचा कारभार म्हणजे एकीकडे जलजीवन मिशन पूर्णत्वाकडे तर दुसऱ्या बाजूला मात्र गावे तहानलेलीच अशी अवस्था आहे.
पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात ३३४ कोटी रुपयांच्या योजना प्रत्येक गावासाठी मंजूर करण्यात आल्या. योजनांचे वाजतगाजत भूमिपूजन करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानीपणे केलेले योजनांचे आराखडे आणि ठेकेदारांना हाताशी धरून केलेली अंमलबजावणी यामुळे योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. काही ठिकाणी पाईपलाईनची कामे झाली तर टाकी बांधलेलीच नाही, अनेक गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत कोरडे असताना पाईपलाईन मात्र पूर्ण. तर अनेक गावांमध्ये मंजूर आराखड्याप्रमाणे काम न करता ठेकेदारांच्या सोयीने कामे केल्याचे दिसून आले. त्यामुळे ११ महिन्यात योजनेचे काम पूर्ण करून ग्राम पंचायतीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश असतानाही मुदत संपूर्ण तब्बल दोन वर्षानंतरही योजना अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा: Purandar: पुरंदरमधील विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारचे एक पाऊल पुढे; शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय?
मागील वर्षी पुरंदर तालुक्यातील ९५ टक्के गावांमध्ये टँकर पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यातून बोध घेवून नागरिकांच्या मागणीप्रमाणे पाणी पुरवठा विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे अपेक्षित असताना त्याकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार वाढीव टाकी, पाईपलाईन, पाण्याचा स्रोत या गोष्टींकडे लक्ष न दिल्यामुळे योजना कुचकामी ठरली आहे. त्याच प्रमाणे बहुतांश योजनांचे प्रस्ताव सुधारित करण्याची आवश्यकता असताना गावच्या लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत ठरली आहे. परिणामी निधी मिळण्यात सुद्धा अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पुरंदर तालुक्यातील अनेक गावच्या सरपंचानी मनमानीपणे काम केल्यानेच जलजीवन योजनेला फारसी बळकटी मिळाली नाही. स्वतः अथवा पत्नी सरपंच असली तरी लोकांना विश्वासात न घेता स्वतःच्या स्वतःच सोयीचे निर्णय घेणे, अनेक ठिकाणी सरपंच हेच ठेकेदार असून स्वतःची ठेकेदारी झाकून ठेवून गावातीलच अनुभव नसलेल्या कार्यकर्त्याला पोट ठेकेदाराचा दर्जा देवून निधीचा अपव्यय करणे. जिथे पाण्याचा स्रोत नाही किंवा अत्यंत घाण पाणी असलेल्या ठिकाणी विहीर खोदण्याचा हट्ट धरणे यामुळे नागरिकांना विरोध करावा लागला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना अधिकार देवून ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामे केल्यास दर्जेदार होतील.
– संतोष राजाभाऊ कुंभारकर, अध्यक्ष, श्री भैरवनाथ प्रतिष्ठान, वनपुरी.
पुरंदर तालुक्यात पंचायत समिती स्तरावरून जलजीवन मिशन अंतर्गत ६७ पाणी योजनेची कामे सुरु आहेत. १६ कामे पूर्ण असून ३१ कामे पूर्ण झालेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. तसेच ५१ ठिकाणी योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. अशी माहिती पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सचिन घुबे यांनी दिली आहे.