कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. बहुतांश भागात पावसाची दडी असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. असे असताना आता मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अनेक ठिकाणी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी (दि.18) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जेऊर, अमरावती, परभणी, अकोला आणि वर्धा येथे ३६ अंशापेक्षा अधिक तर चंद्रपूर येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंदले गेले. उत्तर तमिळनाडू परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मराठवाड्यापासून, कर्नाटक ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.
Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
दरम्यान, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा देखील विस्कळीत झाला आहे. शनिवारी (दि.१९) पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या माघारीस सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सून माघारी फिरताच देशात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.
महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी तापमान
महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यातील परभणीच्या सोनपेठ येथे सर्वाधिक ११० तर बीडच्या परळी वैजनाथ येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस
महाराष्ट्रात १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.५ टक्के पाऊस झाला, म्हणजेच सरासरीपेक्षा १६.५ टक्के कमी पाऊस झाला. दीर्घकाळच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला .
पाणीटंचाईची धास्ती
राज्यभरात पावसाने मोठा खंड दिल्याने संभाव्य पाणीटंचाईची धास्ती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी भूजल उपशावर निर्बंध घालण्याचे निर्देश शासनाने दिले असून, त्याची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यातही होणार का, याकडे लक्ष लागले आहे.






