पुणेकरांना एका दिवसात तिन्ही ऋतूंचा अनुभव (फोटो- ai gemini)
पुणेकरांना एकाच दिवशी तिन्ही ऋतूंचा अनुभव
एका दिवसात किमान तापमानात चार अंश सेल्सिअसची वाढ
काही भागांत हलक्या पावसाची हजेरी
पुणे: पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. १३) हवामानातील मोठ्या चढ-उतारामुळे नागरिकांना संमिश्र वातावरणाचा अनुभव घ्यावा लागला. अवघ्या एका दिवसात किमान तापमानात चार अंश सेल्सिअसची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन तर सायंकाळी काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली.
सोमवारी (ता. १२) पुण्यात किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस होते. मात्र मंगळवारी ते थेट १४.८ अंशांपर्यंत वाढले. त्याचबरोबर कमाल तापमानही ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या अचानक बदलाचा परिणाम शहराच्या हवामानावर स्पष्टपणे जाणवला. पहाटे थंडी, दुपारी उष्णता आणि सायंकाळी ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरी अशा बदलत्या स्थितीमुळे पुणेकरांना एका दिवसात तिन्ही ऋतूंचा अनुभव आला.
दरम्यान, गेल्या काही दिवसात शहरात तापमानातील तीव्र विषमता देखील पुढे आली आहे. अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरात किमान तापमानात सहा ते सात अंशांचा फरक दिसून आला.शिवाजीनगर परिसरात किमान तापमान १०.९ अंश, हवेली तालुक्यात १०.१ अंश इतके कमी नोंदले गेले, तर मगरपट्टा १६.९, लोहगाव १६.२ आणि कोरेगाव पार्क १४.९ अंश सेल्सिअस इतके अधिक तापमान नोंदविण्यात आले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, शिवाजीनगरसारख्या मोकळ्या आणि हिरवाई असलेल्या भागांत रात्री उष्णता वेगाने निघून जात असल्याने थंडी तीव्र जाणवते. तर दाट लोकवस्ती, काँक्रीटची बांधकामे आणि आयटी हब असलेल्या भागांत उष्णता साठून राहते, त्यामुळे रात्रीही तापमान जास्त राहते.पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून किमान तापमान सुमारे १४ अंश राहील. मात्र शनिवारपासून पुन्हा किंचित घट होऊन किमान तापमान १२ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पुण्यात तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहेत.
Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
हुडहुडी कमी होणार!
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील थंडीचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला. यातून गेले दोन महिने तीव्र थंडी सोसणाऱ्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशाना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.






