शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; जुन्नरच्या बल्लाळवाडी येथील घटना
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी (ता.जुन्नर) येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील शेततळ्यात घडली.
शेततळ्याकडे तीन मुले गेली असताना त्यातील सोहम जयसिंग नवले (वय १२) हा मुलगा प्रथम तळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला विघ्नेश महेश पवार (वय ८, रा. बल्लाळवाडी) हा दुसरा मुलगा तळ्यात उतरला. मात्र, पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना उपस्थित असलेला तिसरा मुलगा कार्तिक नवले याने पाहताच त्याने तात्काळ घरी जाऊन माहिती दिली.
त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले असता तब्बल दोन तासांनी बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. दोन्ही मुलांना रेस्क्यू पथक व पोलिसांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गोरे यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. संबंधित तळ्याची जागा डॉ. विनोद ढवळे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाच्या उत्तरेकडील भागात असलेल्या एका तळ्याचे कंपाउंड करण्याचे काम सुरू होते. सुमारे ५० फूट खोल पाणी असलेल्या तळ्याभोवती कुठली सुरक्षा व्यवस्था नव्हती. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी सांगितले.
पोलिसांनी केलं आवाहन
दरम्यान, शेततळ्याचे अपूर्ण काम व सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा होत आहे. उन्हाळी सुट्टीत गावाकडे आलेली मुले खेळण्यासाठी बाहेर जात असताना पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तळी, विहिरी, ओढे किंवा बांधकाम सुरू असलेल्या धोकादायक ठिकाणी मुलांना एकटे जाऊ देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले.
मोठी बातमी ! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार






