मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली (फोटो- सोशल मीडिया)
पिंपरी: उद्योगनगरीतून वाहणाऱ्या पवना,मुळा,इंद्रायणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात दुपारी पवनेचे पाणी शिरले. त्यामुळे तसेच संत तुकाराम महाराजांची आषाढ वारीची पालखी आज शहरात आल्याने महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून पूर परिस्थितीचा तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.संभाव्य स्थितीचा विचार करून योग्य ती तयारी केली असून सुरक्षितता आणि अत्यावश्यक सेवा अखंड ठेवण्यास कटिबद्ध आहे,अशी ग्वाही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
मावळातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे.परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाण्याची टक्केवारी ३५.६३ वर गेली.उन्हाळ्यात ती २४ टक्यापर्यंत खाली आली होती.गेल्या २४ तासात पवना धरण क्षेत्रात ८७ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती या धरणाचे प्रमुख तथा जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी दिली.पवना नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने प्रतिबंधक उपाय म्हणून रमाईनगर झोपडपट्टी,पिंपरीतील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी आज नेण्यात आले. पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकिनारच्या रहिवाशांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेचे आपत्ती निवारण अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी आपला आवाज शी बोलताना केले.
दुसरीकडे संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता,अडथळे दूर करण्याकरिता, पाणी साचण्याच्या ठिकाणी किंवा पूरस्थितीच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आपत्कालीन योजना महापालिका प्रशासनाने सुरु केली आहे.सर्व क्षेत्रीय कार्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरु केला असून पाणी साठणाऱ्या ठिकाणी जलद प्रतिसाद पथके तैनात केली
आहेत.ती पंप,बचाव साहित्याने सज्ज आहेत.अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने १५ बोटी,२०० लाईफ जॅकेट्स तयार ठेवली आहेत.
पवना आणि इंद्रायणी नद्यांलगत असलेल्या पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.आरोग्य पथकेही तयारीत असून काही ठिकाणी त्यांनी निर्जंतुकीकरण सुरुही केले आहे.एकूणच प्रशासन सतत हाय अलर्ट मोडवर असल्याचे स्पष्ट करीत नागरिकांनीही देण्यात येणाऱ्या सूचनांवर लक्ष ठेऊन सहकार्य करावे व जागरूक राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला
पुणे जिल्हा आणि शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान अजूनही पुण्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा विसर्ग 2000 क्युसेक इतका होता. तर पावसाचा जोर वाढल्याने धरणातून आता 4,345 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Pune Monsoon Update: पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध असा बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.