आमदार हेमंत रासने (फोटो - सोशल मिडिया/ट्विटर)
पुणे: पुणे शहरातील विशेषत गावठाण भाग असणाऱ्या पेठांमधील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी आग्रही भूमिका घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शासकीय धोरणामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ठाणे तसेच मुंबईमध्ये करण्यात आलेल्या सुधारित धोरणांच्या धर्तीवर पुणे शहरासाठी स्वतंत्र सुधारित धोरण राबवावे. सोबतच कसबा मतदारसंघाला संपूर्ण झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्रक्रिया देखील सुलभ करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.
शहरातील अनेक वाड्यांचे बांधकाम अतिशय जिर्ण अवस्थेत असून नागरिकांना धोकादायक परिस्थितीत राहावं लागत आहे. विद्यमान नियमांमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे वाड्यांच्या पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरात राबवण्यात आलेल्या धोरणानुसार पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी. यासाठी संबंधित विभागाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करून हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय सोडवण्याला गती देण्याची मागणी रासने यांनी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहनिर्माण आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याबद्दल बोलताना रासने म्हणाले ‘‘पुणे शहर आणि कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य कार्यवाही होईल.’’
शहराच्या मध्यवर्ती भागासाठी ‘या’ दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रस्तावास गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. परिणामी, वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग हे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार असून, पुणेकरांसाठी हा एक महत्त्वाचा बदल ठरेल.या प्रस्तावास गती देण्यासाठी हेमंत रासने यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भोसले यांनी दिले आहे. तसेच, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा शब्द दिल्याची माहिती रासने यांनी दिली आहे. खडक येथील रखडलेल्या मामलेदार कचेरीच्या बांधकामाला गती देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.