२५ कोटींच्या पुलाचा खर्च वाया? नेरळ-कळंब रस्त्यावरील नवीन पुलाखालील काँक्रीटीकरण गेले वाहून
संतोष पेरणे/ कर्जत: माथेरान–नेरळ–कळंब राज्यमार्गावरील दहिवली मालेगाव येथे उल्हास नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामाला २०२४ मध्ये सुरुवात झाली असून काही पिलर उभे राहिले आहेत. मात्र, या पिलरखालील काँक्रीटीकरण अलीकडील पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे पुलाच्या पाया भागाला धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराच्या “चोचल्यांसाठी” काम करत आहे काय, असा प्रश्न स्थानिक वाहनचालक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. “बांधकाम विभाग जनतेसाठी काम करतो की ठेकेदारासाठी?” अशी टीकाही होत आहे.
दहिवली मालेगाव येथे उल्हास नदीवरील जुना पूल सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधला गेला होता. तो कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात महापुरामुळे पुलावरून वाहतूक ठप्प होते. त्यामुळे येथील नागरिकांनी अनेक वर्षांपासून नव्या पुलाची मागणी केली होती. आमदार महेंद्र थोरवे यांनी या पुलासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यानंतर या प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली.
राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
सुमारे २५ कोटी रुपयांच्या खर्चाचा हा पूल १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही पुलाचे अर्धे कामसुद्धा पूर्ण झालेले नाही. ठेकेदार कंपनीने फक्त आठ पिलर उभे केले असून कामाची गती अत्यंत संथ आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारावर कोणतीही कारवाई किंवा नोटीस न दिल्याने प्रशासनावरील प्रश्नचिन्ह वाढले आहे.
पिलरखालील काँक्रीटीकरण पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने पुलाची मजबुती धोक्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव स्पष्ट दिसत असून पुलाचे भवितव्य काय होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
श्रावण जाधव (रिक्षाचालक) यांनी सांगितले की दहिवली मालेगाव पुलाचे काम जनतेसाठी सुरू आहे की ठेकेदारासाठी, हेच आता समजत नाही. कामाला दीड वर्ष पूर्ण झाले तरी पुलाचे खांबही नीट उभे राहिलेले नाहीत. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी आमची मागणी आहे.