कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील सर्वात उंच दुर्गम भागात असलेल्या तुंगी गावात राहणारे ग्रामस्थ गेली 10 दिवस अंधारात आहेत.वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामध्ये तुंगी गावाला विक पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांबांवर झाडे कोसळल्याने येथील वीज पुरवठा खंडित आहे.दरम्यान,महावितरण कडून दोन दिवसात तुंगी गावाचा वीज पुरवठा सुरळीत होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील तुंगी हे गाव अंभेरपाडा ग्रामपंचायत मधील दुर्गम भागातील गाव आहे.एका उंच डोंगरावर वसलेल्या या गावात साधारण 70 घरे असून तेथे 2017 मध्ये वीज पोहचली.या मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वन जमिनीचा प्रश्न सोडवून तुंगी गावाला वीज पोहचवणे हे कठीण असलेले काम शक्य झाले.खासदार बारणे यांच्या माध्यमातून तुंगी गावाला डोंगरपाडा येथून वीज पोहचली आणि त्यानंतर खासदार बारणे यांच्याकडून रस्त्याचा प्रयत्न होऊ लागला.त्यानंतर 2019 मध्ये वन जमिनीमध्ये रस्ता तयार करून तुंगी गावाचा जगाशी संपर्क झाला.मात्र त्याच तुंगी गावाला होणारा वीज पुरवठा 20मे पासून खंडित आहे.तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू होता आणि त्या अवकाळी पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्याने तुंगी गावाला वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर झाडे कोसळली होती.मात्र त्या दिवसापासून तुंगी ग्रामस्थ हे वीज नसल्याने अंधारात आहेत.
तुंगी गावाला डोंगरपाडा भागातून वीज जात असून विजेचे खांब हे डोंगरात उभे केले आहेत.त्या मार्गावर कशेळे पासून डोंगरपाडा पर्यंत भरपूर झाडे अवकाळी पावसाने विजेच्या वाहिन्यांवर कोसळली आहेत.ही झाडे वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरली असून तुंगी गाव गेली 10 दिवस अंधारात आहे.त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तालुक्याचे महावितरण विभागाचे उपअभियंता कार्यालयाला कळवले,मात्र तरी देखील वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही.
आपत्कालीन बैठकीत साधी चर्चा नाही..
कर्जत तालुका आपत्कालीन बैठक सोमवारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली करत तहसील कार्यालयात झाली.त्या बैठकीत सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मात्र तालुक्यातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे याबद्दल साधी चर्चा आपत्कालीन बैठकीत झाली नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.आमदारांनी तालुक्यातील सर्व खात्याचा आढावा घेतला मात्र तुंगी गावातील ग्रामस्थ अंधारात आहेत याचा आढावा घेतला गेला नाही.
ग्रामस्थांनी घेतला सौर ऊर्जेचा आधार..
तुंगी गावाला 2017 मध्ये वीज पोहचली आणि त्यानंतर त्या गावातील ग्रामस्थांनी दूरचित्रवाहिनी पाहिली.त्या आधी या गावातील प्रत्येक ग्रामस्थांचे घरावर सौर दिवे यांचे सोलर पॅनल असायचे.मागील काही दिवस हे ग्रामस्थ त्याच सोलर पॅनल यांचा उपयोग करीत असून त्यांच्या माध्यमातून गावातील काही घरांमध्ये विजेचे दिवे मिणमिणताना दिसून येत आहेत.
डॉ धनंजय जाधव.. तहसीलदार
तुंगी गावातील विजेचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न आम्हाला समजल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महावितरण कंपनी यांच्या उप अभियंता यांना कळविण्यात आले आहे.
चंद्रकांत केंद्रे.. उप अभियंता महावितरण
तुंगी गावाला पोहोचणारे वीज वाहिनी यांच्या मार्गात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब कोसळणे आणि वीज वाहिन्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.त्यावर काम सर्व भागात सुरू असून आम्ही पुढील दोन दिवसात दुर्गम भागातील तुंगी पर्यंत पोहचून वीज पुरवठा पूर्ववत करणार आहोत.