कर्जत/ संतोष पेरणे: तालुक्यात असलेल्या आसल ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आसल येथील गाव तलावातील मासे आज सकाळी मृत अवस्थेत आढळून आले. ग्रामपंचायत कडून सदर गाव तलाव लिलावात मासेमारी व्यवसाय करण्यासाठी एका शेतकऱ्याने घेतला होता.दरम्यान, सदर तलावातील माशांचा मृत्यू कशामुळे झाला? याचा अभ्यास करण्यासाठी सदर तलावातील पाणी तपासणी साठी अलिबाग येथे कर्जत पंचायत समिती कडून पाठवण्यात आले आहे.नेरळ पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पाणी तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
आसल ग्रामपंचायत हद्दीमध्ये आसल या गावाशेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीचे गाव तलाव आहे.साधारण तीन एकर जमिनीमध्ये असलेल्या या तलावात मासेमारी व्यवसाय करता यावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने हा तलाव तीन वर्षे राखण्यासाठी रोहिदास वसंत शेंडे या शेतकऱ्याला दिला होता.शेंडे यांनी त्या तलावात ६० हजार रुपयांचे दीड लाख माशांची पिल्ले सोडली होती आणि तलावातील माशांचे वजन साधारण दीड ते दोन किलो वजन एवढे झाले होते.त्यात तलावात भरपूर पाणी असल्याने चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती.मात्र आज सकाळी या तलावाच्या पाण्यावर असंख्य मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने रोहिदास वसंत शेंडे हे शेतकरी नैराश्यात गेले आहेत.तलावाच्या पाण्यावर आणि काठावर शेकडो मासे मृत अवस्थेत दिसून येत असून त्या बाबत तलाव तीन वर्षाच्या करारावर घेणारे शेतकरी शेंडे यांनी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांना या बाबत कल्पना दिली.
तलावातील पाणी विषारी झाल्याने हे सर्व मासे मृत झाले असून या घटनेने आसल ग्रामपंचायत मध्ये संताप व्यक्त होत आहे.लाखो मासे मृत झाले असून ते कोणालाही खाणे शक्य नाही आणि त्यामुळे सर्व मासे बाहेर काढून तलावातील सर्व दूषित पाणी देखील बाहेर काढावे लागणार आहे.या घटनेची माहिती कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांना देण्यात आली असता त्यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांना पाठवून दिले.कर्जत पंचायत समिती कडून गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी ग्रामपंचायत अधिकारी जाधव यांच्या मदतीला विस्तार अधिकारी यांना पाठवून दिले. गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार या तलावातील पाण्याची तपासणी करण्यासाठी तत्काळ अलिबाग येथे पाठवण्यात आले आहे.तपासणी साठी पाठवण्यात आलेल्या त्या पाण्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पोलिसांकडून गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
रोहिदास शेंडे,शेतकरी
तलाव ग्रामपंचायत कडे २० हजार रुपये भरून राखण करण्यासाठी घेतल्यावर त्यातून काही उत्पन्न निघावे म्हणून ६०हजार रुपयांचे माशांचे पिल्ले आणून सोडली आहेत.आता सर्व मासे मेले असून कोणीतरी तलावाच्या पाण्यात विष टाकले असल्याचा संशय आहे.मात्र या प्रकाराने माझे लाखोंचे नुकसान झाले आहे.
सुशांत पाटील ,गटविकास अधिकारी
आम्ही तत्काळ तलावातील पाण्याचे नमुने घेण्यास सांगितले असून पाण्यात विष मिसळलेले आढळून आल्यास योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन करेल आणि त्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेईल.
पाण्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर पाण्यात विष टाकले असल्याचे सिद्ध झाल्यास त्यानुसार गुन्हे नोंद होण्याची प्रक्रिया केली जाईल, असं ,पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सांगितलं आहे.