तळा/श्रीकांत नांदगावकर : शहरातील डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर होणार तरी कधी असा प्रश्न आता शहर वासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
तळा नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था मालकीच्या तळा धरणाजवळ केली आहे.शहरातील सर्व गोळा केलेला ओला व सुका कचरा एकत्रित या ठिकाणी टाकला जातो. मात्र या डम्पिंग ग्राऊंडच्याभोवती संरक्षक भिंत न बांधल्यामुळे मोकाट गुरे,कुत्रे व पक्षांनी तो पसरला जात आहे.यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते जवळच तहसिल कार्यालय असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.तसेच डम्पिंग ग्राऊंड शेजारीच निम्म्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल मारण्यात आली आहे.
डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेला हा कचरा कुजून घाण पाणी जमिनीत मुरले जात आहे.त्यामुळे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या डम्पिंग ग्राऊंड चे स्थलांतर शहरातील आंबेळी येथे नगरपंचायतीच्या मालकी हक्क असलेल्या जागेत होणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगितले गेले होते. त्यानुसार त्या ठिकाणी काम ही पूर्ण करण्यात आले आहे.मात्र त्या ठिकाणी डम्पिंगला ग्रामस्थांच्या असलेल्या विरोधामुळे अद्यापही धरणा शेजारीच शहरातील कचरा टाकण्यात येत आहे.यामुळे तळा शहरातील कचऱ्याची समस्या बिकट होत चालली असून उन्हाळी हा कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे सदर डम्पिंग ग्राऊंड लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी तळा येथे घेतलेल्या जनता संवाद कार्यक्रमात विविध विषयांवरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले. तळा शहरातील पंचायत समितीच्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून जनता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुका वासीयांनी तळा तालुक्यातील चोरीला जात असलेले गुरे,रहाटाड येथे नियोजित जागे ऐवजी इतरत्र बांधण्यात येत असलेले आरोग्य उपकेंद्र,जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेली अपूर्ण कामे,घरकुल लाभार्थ्यांना लांब अंतरावरून आणावी लागणारी वाळू यांसह विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले.या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत चांगलीच कान उघडणी केली.तसेच तालुक्यातील विविध समस्यांबाबत नागरिकांचे निवेदने स्वीकारून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.याप्रसंगी प्रांत अधिकारी संदीपान सानप,तहसीलदार स्वाती पाटील नगराध्यक्षा माधुरी घोलप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांसह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी,सर्वपक्षीय पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.