संग्रहित फोटोे
सांगली/प्रवीण शिंदे : सांगली–मिरज–कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला तसेच भाजपला सुरुवातीला हलक्यात घेण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीने प्रारंभापासूनच स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली. पुढे काँग्रेस आघाडीची साथ मिळाल्याने सर्वच प्रभागांमध्ये परस्पर सहकार्याची भूमिका घेण्यात आली. भाजपविरोधात एकच पॅनेल उभे राहील, याची दक्षता घेतली गेली. मात्र निकालानंतर सत्ताकारणाची गणिते पूर्णपणे बदलली. आघाडीतून लढलेला राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष थेट भाजपसोबत गेल्याने सत्तेत येण्याची आघाडीची स्वप्ने चक्काचूर झाली.
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुका नुकत्याच बिनविरोध पार पडत भाजपने शहरातील सत्ताकारण आपल्या ताब्यात घेतले. गतवेळी भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या, तर यावेळी ३९ जागांवरच समाधान मानावे लागले. तरीही काठावरचे बहुमत असताना अचूक संख्या जुळवाजुळव करत भाजपने मोठे बहुमत उभे केले.
निवडणूक रणधुमाळीत काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासारख्या तगड्या विरोधकांना भाजपने राजकीय व्ह्यूह रचनेत पराभूत केले. यंदा भाजपने महापालिका निवडणुकीपासूनच अतिशय सावध आणि मोजकी पावले टाकली. संघर्ष टाळत, मात्र डावपेचात आक्रमक राहून भाजपने आपली चाल खेळली. स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना अजित पवार यांच्या निधनाचे कारण पुढे करत महापौर–उपमहापौर निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. या बिनविरोध निवडीमुळे केवळ सत्तेवरच नव्हे, तर महापालिकेच्या राजकारणावरही भाजपची पकड अधिक मजबूत झाली.
काठावरचे बहुमत असल्याने संख्याबळ वाढवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतंत्र राजकीय रणनीती आखली. याला भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शेखर इनामदार आणि सुरेश आवटी यांची साथ लाभली. राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेने भाजपविरोधात निवडणूक लढविल्याने त्यांच्या पाठिंब्याबाबत भाजपमध्ये मतभेद होते. मात्र सत्ता समीकरणे आपल्या बाजूने झुकविण्यासाठी भाजपने दोन पावले मागे घेत राष्ट्रवादीसोबत तडजोड केली आणि उपमहापौर पद देत संख्याबळ सुमारे ५५ पर्यंत नेले.
हे सुद्ध वाचा : मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर…; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन
गतवेळची सल, आता नाही…!
गतवेळी भाजपला ४१ जागा मिळूनही जयंत पाटील यांनी राजकीय खेळी करत भाजपचे सात नगरसेवक नॉट-रीचेबल केले होते आणि राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौर बनवले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी अवघ्या तीन मतांनी पराभूत झाले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पाठिंबा मिळाल्याने युतीचे संख्याबळ ५५ वर पोहोचले आहे. बहुमताचा आकडा आरामात पार झाल्याने महापौर व उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता भाजपने शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षालाही सोबत घेण्याची तयारी दर्शवली असून, काँग्रेसला पूर्णपणे एकाकी पाडण्याचा डाव आखण्यात आला आहे. तो यशस्वी ठरताना दिसत आहे. विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भूमिका घेण्याची संधी असूनही काँग्रेसने प्रक्रियेतून माघार घेतल्याने त्यांचे राजकीय नुकसान अधिकच गडद झाले आहे. गतवेळी बहुमत असूनही महापौर न मिळाल्याची सल, यावेळी राहू नये याची खबरदारी भाजपने घेतली आहे.






