नवी मुंबई:– नेरुळ परिसरात लॉजमध्ये मृतदेह आढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत नेरुळ पोलिसांनी तपास सुरु केला आहे. शिरवणे गावातील न्यू मिनी महल लॉज मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अति प्रमाणात उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याने महिलेचा मृत्यू झाला , असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतील शिरवणे गावात असणाऱ्या न्यू मिनी महल या लॉज मध्ये एक जोडपं रात्रीच्या सुमारास आलं होतं. सकाळच्या वेळेस लॉज मधील कर्मचाऱ्यांना संशयास्पद वाटल्याने दरवाजा उघडला असता, सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जागेची पाहणी केली. तेथील परिस्थितीवरून महिलेने उत्तेजक द्रव्याचे अति प्रमाणात सेवन केल्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात पाठवला असून नेमकं कारण शवविच्छेदनानंतर समोर येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी लॉज मधील सीसीटीव्ही कॅमेरे व रजिस्टरची तपासणी केली . मृत महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि इतर वस्तूंची तपासणी करत त्याच्या मार्फत नेरुळ पोलीस सदर इसमाचा शोध घेत आहेत.
नेरूळ मधील शिरवणे गाव हे कधी काळी शिक्षकांच आदर्श गाव म्हणून ओळखलं जात होतं. मात्र याच गावात अनेक अवैद्य धंदे सुरू असून, नेरूळ पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने, शिक्षकांच्या याच आदर्श गावाची ओळख पुसली जात असून, येथे अवैध धंद्याचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नेरूळ परिसरातील अवैद्य धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करून बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.