आपत्तीकालीन परिस्थितीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज
पिंपरी : मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. महापालिकेने प्रत्येक प्रभागनिहाय विशेष पूर नियंत्रण पथके नेमली असून, या पथकांकडे तातडीची मदत, बचावकार्य आणि नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिकेकडून पूर आणि अन्य आपत्तींमध्ये मदतकार्य करण्यासाठी आधुनिक व अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात १० रबर बोट्स (IRB), २०० लाइफ जॅकेट्स, ४४ लाइफ रिंग्स, ५९ रोप्स, १० हुक्स, १३ पोर्टेबल पंप, वॉटर टेंडर, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल, फायर फायटिंग मोटारसायकल, ४८ कार्यरत अग्निशमन वाहने, तसेच वायरलेस सेट्स, वॉकी-टॉकी, मेगाफोन आणि टॉर्चेस यांचा समावेश आहे.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पूरस्थिती किंवा कोणतीही आपत्ती उद्भवल्यास घाबरून न जाता १०० (पोलीस), १०१ (अग्निशमन) किंवा १०८ (आपत्कालीन मदत) या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा. तसेच, संबंधित प्रभाग कार्यालय अथवा अग्निशमन केंद्राशी थेट संवाद साधावा, जेणेकरून मदत त्वरित पोहोचू शकेल.
पथकांचे कार्य आणि जबाबदाऱ्या
अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना पोहण्याचे तसेच रेस्क्यू ऑपरेशन्सचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पूरप्रवण भागांची माहिती, पाण्याची पातळी, वाहणाऱ्या पाण्याचा वेग आणि साचणाऱ्या ठिकाणांची माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे बचाव कार्य अचूकपणे आणि वेगाने करता येईल.
पथकांकडून करण्यात येणारी प्रमुख कामे
नागरिकांचा जीव आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीकालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रभागनिहाय पथकांकडे आवश्यक साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता थेट संपर्क साधावा.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमचा अग्निशमन विभाग सज्ज आहे. पाणी भरलेल्या भागांतून पंपिंग मशीनद्वारे पाणी काढणे, झाडे हटवणे, तसेच रबर बोट व लाइफ जॅकेटद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे यासाठी सर्व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.