मुंबई: छगन भुजबळ, नारायण राणे आणि नुकतीच झालेली एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी या कुणाशीही आपली तुलना करू नका, मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Raj Thackeray) हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. मुंबईत आज मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी राज्यभरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत.
[read_also content=”पावसाळी अधिवेशन सुरु असताना विधान भवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न https://www.navarashtra.com/maharashtra/farmers-suicide-attempt-near-mantralaya-nrsr-318789.html”]
राज ठाकरे यावेळी म्हणाले. “माझं बंड भुजबळ, राणे, शिंदेंच्या बंडाच्या यादीत घेऊ नका. हे सगळे एका पक्षात गेले, सत्तेत गेले. पण मी बाळासाहेब ठाकरेंना भेटून, त्यांना सांगून बाहेर पडलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की राज ठाकरे आता पक्षात राहात नाही.. ती माझी शेवटची भेट होती”, असं राज ठाकरे म्हणाले.
कोरोनामुळे हाडांचा त्रास बळावला, शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची पहिलीच सभा आहे. माझ्या शस्त्रक्रियेला २ महिने पूर्ण झाले आहे. शस्त्रक्रियेचा अनुभव भयंकर होता असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. उद्या पुणे दौऱ्यावर जातोय. प्रवास करताना त्रास होतोय का ते बघतो असं ते म्हणाले.
ते म्हणाले, मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. मनसे कुठलंही आंदोलन अपूर्ण सोडत नाही. टोलमुक्तीचे आश्वासन शिवसेना-भाजपचं होतं. मात्र याबाबत आंदोलन मात्र मनसेनी केलं. शिवसेना-भाजपला कोणी प्रश्न का विचारत नाही ? या टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न होता, मात्र हे टोलबाबतच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच सरकारने दिली नाही. म्हणजेच हा टोलचा पैसा सगळ्या पक्षांना जातो, आणि म्हणून नेते टोलबाबत प्रश्न विचारत नाहीत, तसेच मी टोल बंद करून दाखवतो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसेच्या आंदोलनानंतर मशिदीवरचे भोंगे बंद झाले. यानंतर जवळपास ९२ टक्के ठिकाणांवरील भोंगे बंद झाले आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत कसे पोहचता हे महत्वाचं आहे. असं राज ठाकरे म्हणाले. सध्याचं राजकीय वातावरण राज्यासाठी चांगलं नाही. अडीच वर्षात जे घडलं ते चांगलं नव्हतं. फक्त निवडणुका त्यांच्या डोक्यात आहेत, कोण कुणासोबत आहे, हे कळतच नाही, आणि ही सत्तेची आणि आर्थिक जुळवणूक आहे. असं राज ठाकरे म्हणाले.